अंबा नदी झाली गढूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबा नदी झाली गढूळ
अंबा नदी झाली गढूळ

अंबा नदी झाली गढूळ

sakal_logo
By

पाली, ता. ५ (वार्ताहर) : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून थेट पाणीपुरवठा केला जातो. या नदीच्या पाण्यात गुरुवारी (ता. ५) अचानक चिखल व गाळ आल्याने पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे पाली व इतर गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी गढूळ झाले होते. चिखलामुळे अंबा नदीचे पाणी पूर्णपणे मातकट रंगाचे झाले आहे. नळाद्वारे गढूळ पाणी आल्याने पालीतील नागरीरिकांनी चिंता व्यक्त केली.
अंबा नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट अंबा नदीत सोडले जात आहे. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल २० कोटींची शुद्धपाणी योजनाही लालफितीत अडकलेली आहे. परिणामी, भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. आतापर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ व चिखल हे नेहमीच येत असते. आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणीही अंबा नदीमध्ये सोडले जाते. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहिरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरूनही नागरिकांना प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

-------------------
नुकतेच पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आहे. विविध विकासकामांना निधी आला असून कामे सुरू झाली आहेत. लवकरच २० कोटींची शुद्ध पाणी योजनाही कार्यान्वित करू.
- गीता पालरेचा, नगराध्यक्षा, पाली

--------------------
उन्हेरे धरणातून चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदी दूषित झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गाळ साचल्याने नदीचे पात्र अरुंद होईल. पावसाळ्यात पुराचा धोका संभवतो. तसेच हा गाळ पाणी खेचणाऱ्या मोटर पंपात गेल्यास मशीन बंद पडू शकते. त्यामुळे पालीकरांवर कृत्रिम पाणी टंचाईचे संकट येऊ शकते.
- अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली

---------------------
पाटबंधारे विभागाने बहुतेक उन्हेरे धरणातील पाणी नगरपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता अंबा नदीमध्ये सोडले आहे. त्यामुळे पाणी गढूळ झाले आहे. पाण्यात नगरपंचायतीद्वारे औषध टाकण्यात आले आहे. दोन-तीन दिवसांत गाळ खाली बसेल. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.
- सुलतान बेनसेकर, पाणीपुरवठा सभापती, पाली नगरपंचायत


शुद्ध नळपाणी योजना लालफितीत
सरकारने केलेल्या २००८ -०९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या आणि दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण ७ कोटी ७९ लाखांचा निधी आणि १० टक्के लोकवर्गणीद्वारे नळयोजना उभी राहणार होती. परंतु, राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली. पालीला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली असून सद्यस्थितीत ही योजना २० कोटींवर गेली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35506 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top