पर्यटनस्‍थळे हाउसफुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनस्‍थळे हाउसफुल
पर्यटनस्‍थळे हाउसफुल

पर्यटनस्‍थळे हाउसफुल

sakal_logo
By

अमित गवळे ः पाली
ऐतिहासिक किल्‍ले, विस्तीर्ण २४० किमीचा समुद्र किनारा व प्रसिद्ध धार्मिक स्थळांमुळे रायगड जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते. उन्हाळी सुट्यांमुळे सध्या येथील पर्यटनस्थळे हाऊसफुल आहेत. समुद्रालगतचे हॉटेल, रेस्‍टॉरंटमध्ये पर्यटकांनी बहरली असून एसी रूमची मागणी वाढली आहे. महागाईमुळे निवास व्यवस्‍था, खाद्यपदार्थांच्या किमती जवळपास २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या असल्‍या तरी पर्यटनावर त्‍याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. त्‍यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यवसाय, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे.
अलिबाग- नागाव, वरसोली, मुरूड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. याशिवाय थंड हवेचे ठिकाण म्‍हणून माथेरानला पसंती मिळत आहे. आठवडाभरापासूनच येथील काही हॉटेल व लॉज बुक झाले असले तरी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी स्‍थानिक व्यावसायिक घेत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगड जिल्‍ह्यात आहेत. खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर. सध्या येथे सकाळी व सायंकाळी भाविकांची रीघ लागलेली आहे.
उष्णता अधिक असल्याने रायगड किल्ल्यावर पर्यटक कमी प्रमाणात येत आहेत. समुद्रातील मुरूड- जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला व उरणजवळील घारापुरी/अजंठा लेणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. महिनाभरात येथील महसुली उत्पन्नात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.

खाद्यपदार्थ, निवास महागला
हॉटेल व खाणावळीतील जेवणाच्या व राहण्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माथेरानमध्ये एका जोडप्यासाठी एक दिवस-रात्रीसाठी १२०० ते १८०० रुपये साध्या खोलीसाठी; तर दोन ते चार हजार एसी रूमसाठी भाडे आहे. अलिबाग व मुरूड तालुक्यात चार व्यक्तींना राहण्याचा दर एक दिवस-रात्रीसाठी साधारण खोलीकरिता १५०० रुपये, तर एसी व एलईडी असलेल्या खोलीकरिता २२०० ते ४००० पर्यंत आहे. हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन येथे साध्या खोलीकरिता १२०० ते १६००; तर एसी रूमसाठी २२०० रुपयांपासून तीन हजार रुपयांच्या पुढे आहे. बहुतांश ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेलमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. ग्राहकांसाठी विविध ऑफरही दिल्‍या जात आहेत.

किनाऱ्यावर विविध राईड्स
अलिबाग- नागाव, वरसोली, मुरूड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. किनाऱ्यांवर बोटिंग, घोडागाडी, बनाना, बाईक राईडची व पॅराग्लायडिंगची मजा पर्यटक घेत आहेत. यांचे दरही वाढले आहेत.

सुट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. देवदर्शनाबरोबर पर्यटक समुद्रकिनारी विविध राईड्सची मजा घेतात. त्‍यामुळे स्‍थानिक व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले आहेत. शिवाय महसूलही वाढत आहे. उष्‍मा वाढल्‍याने यंदा एसी रूमना अधिक मागणी आहे. विजेचे दर वाढल्याने एसी रूमचे भाडे वाढवण्यात आले आहे.
- अमित खोत, सरपंच, हरिहरेश्वर.

उन्हाची काहिली वाढल्‍याने रायगड किल्ल्यावर दुर्गप्रेमी व पर्यटकांची फारशी गर्दी नाही. त्यामुळे रोप-वेची सायंकाळची वेळ वाढविण्यात यावी, जेणेकरून ऊन कमी झाल्यावर दुर्गप्रेमी किल्ल्यावर येऊ-जाऊ शकतील. अनेक लोक समुद्र किनाऱ्यांना पसंती देत आहेत.
- अजित औकिरकर, व्यावसायिक, रायगड किल्ला, हिरकणीवाडी.

सुट्टी असल्याने आगाऊ बुकिंग झाली आहे. पर्यटकांना उत्तम सेवा-सुविधा देण्यासाठी तयार आहोत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा व्यवसाय चांगला होत आहे.
- मनीष पाटील, चालक, माऊ रिसॉर्ट, दिवेआगर.


उष्मा वाढल्याने सकाळी व सायंकाळी भाविकांची गर्दी अधिक असते. भाविकांची संख्या वाढत आहे. आर्थिक उलाढाल चांगली होत आहे.
- राहुल मराठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर देऊळ.

समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी आहे. या बरोबरच पर्यटक कांदळवन सफरीलाही पसंती देत आहेत. येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्य पाहत आहेत.
- सिद्धेश कोसबे, अध्यक्ष, दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटन गट.

मुलांना उन्हाळी सुटी असल्‍याने रायगडमध्ये सहकुटुंब पर्यटनासाठी आलो आहे. उष्मा असल्याने समुद्र किनाऱ्यावर जाणे पसंत करत आहे. येथे चांगल्याप्रकारे सुविधा व वागणूक मिळत आहे.
- किशोर बटवा, पर्यटक, मुंबई.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35511 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top