समुद्र किनारे प्रदूषणमुक्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्र किनारे प्रदूषणमुक्‍त
समुद्र किनारे प्रदूषणमुक्‍त

समुद्र किनारे प्रदूषणमुक्‍त

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः अलिबाग
समुद्र किनाऱ्यावर येणारा कचरा, तेलतवंग, प्लास्‍टिक बाटल्यांमुळे जलप्रदूषण वाढत असून मासेमारीसह पर्यटनावरही परिणाम होत आहे. हे रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला असून रायगड जिल्‍ह्यातील समुद्र किनारे स्‍वच्छ ठेवण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
मे अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात हे यंत्र दिले जाईल. किनाऱ्यावर पडलेला कचरा, प्लास्‍टिक बाटल्या, मलमूत्रांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवता येणार आहे. यातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे किनारा स्वच्छतेबरोबरच प्रदूषण मुक्तीसाठी स्वयंचलित यंत्र एक वरदान ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, काशीद, श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगर, दिघी आगरदांडा, रेवदंडा, नागाव, आक्षी, किहीम, वरसोली, मांडवा, सासवणे, नांदगाव असे अनेक विस्‍तीर्ण समुद्रकिनारे आहेत. सुटीच्या दिवशी याठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनामुळेच स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो. वर्षाला सुमारे दहा लाख पर्यटक या ठिकाणी येत असून रायगड जिल्ह्याला पर्यटनाचे महत्त्व प्राप्त झाले आहे; परंतु रिकाम्या प्लास्‍टिकच्या बाटल्या, किनाऱ्यावर करण्यात येणारी उंट सवारी, घोड्यांचे मलमूत्र व अन्य कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील सौंदर्यांत बाधा येते.
किनाऱ्यावर पडलेल्‍या कचऱ्यामुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होतो, शिवाय पर्यावरणाचा समतोलही बिघडतो. समुद्रकिनारा अस्वच्छ असल्‍यास पर्यटक त्‍याठिकाणी जाणे टाळतात.

जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्‍यामुळे निसर्गाचे वरदान लाभलेल्‍या समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्य आणखी खुलेल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता राखण्यासाठी स्वयंचलित यंत्र रायगड जिल्ह्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. यंत्राच्या मदतीने किनारपट्टी साफ केली जाईल. कमी मनुष्यबळात हे यंत्र किनाऱ्यावरील स्वच्छता जलद गतीने करेल.
आठ दिवसांत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने एक कोटी रुपयांचे यंत्र रायगड जिल्ह्याला वितरित केले जाणार आहे. त्यामुळे मे महिनाअखेर स्वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्र रायगड जिल्ह्याच्या ताफ्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे.

यंत्राची जबाबदारी नोडल ऑफिसरकडे
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जिल्हा प्रशासनाकडे स्वयंचलित यंत्र दिले जाणार आहे. यंत्राची जबाबदारी जिल्ह्यातील नोडल ऑफिसरकडे सोपविली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यासाठी नोडल ऑफिसर म्हणून उपजिल्हाधिकारी अमित सानप यांची नियुक्ती केली आहे. ज्या समुद्रकिनारी स्वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्राची गरज आहे, त्या ठिकाणी नोडल ऑफिसरच्या मान्यतेने यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत मुंबई, उपनगर, ठाणे व रायगड आदी जिल्ह्यांतील समुद्र किनाऱ्यातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी एक स्वयंचलित यंत्र जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले जाणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हे यंत्र वितरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.
- विद्यासागर किल्लेदार, प्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35515 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top