चला... पुन्हा गोट्या खेळू! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला... पुन्हा गोट्या खेळू!
चला... पुन्हा गोट्या खेळू!

चला... पुन्हा गोट्या खेळू!

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग
प्राचीन काळापासून खेळला जाणारा मातीतील पारंपरिक गोट्यांचा खेळ कॅण्डी क्रश, फ्री फायर अशा मोबाईल विश्वातील खेळामुळे कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. अनेक जण या खेळाऐवजी मोबाईलमध्ये मग्न असायचे. परंतु, या वर्षी हे रूपडे पालटलेले दिसून येत आहे. मोबाईलच्या जगतात हरवलेल्या गोट्यांच्या खेळाने पुन्हा तग धरला आहे. उन्हाळी सुट्टी जाहीर होताच रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुले गोट्यांचा खेळ खेळण्यामध्ये मग्न आहेत.
गोट्या हा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. देशभरातील खेडेगावात सर्वत्र खेळला जाणारा हा खेळ उत्तर भारतात कांचे आणि दक्षिणेत गोल्ली गुंडू या नावाने ओळखला जातो. लहान मुलांपासून ३० वयोगटातील मुले पूर्वी हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळत होते. गावे, वाड्यांमध्ये फेरफटका मारल्यावर गल्लीबोळात मुले खेळताना दिसायचे. मार्च-एप्रिलमध्ये तर परीक्षा संपताच अनेक मुले गोट्या खरेदी असायचे. कालांतराने गोट्या खेळाला स्पर्धा म्हणूनही पाहिले जाऊ लागले. मात्र, जसे मोबाईल युग आले तसे मातीतले खेळ दुर्लक्षित होऊ लागले. मातीतल्या खेळाऐवजी कॅण्डी क्रश, फ्री फायर, पब्‍जी, जंगली, रमी, सब वे सर्फर, टेम्पल रन अशा अनेक प्रकारच्या खेळाला मुले पसंती देऊ लागले. त्यामुळे गोट्यांचा खेळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. तो फक्त कथा-कादंबरी आणि गोष्टींमध्येच राहतो की काय असेच चित्र होते. मात्र, त्यात या वर्षी बदल झाल्याचे दिसून आले आहे. उन्हाळी सुटी पडताच अनेकांनी गोट्या खेळाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गोट्यांना पुन्हा नवसंजीवनी मिळू लागली आहे. मोबाईलमध्ये रमणारी मुले पुन्हा मातीत गोट्या खेळतात दिसत आहेत. ग्रामीण भागात आदिवासीवाड्यांसह गावोगावी या खेळाला अधिक पसंती येऊ लागली आहे. सुट्टीचा आनंद घालवण्यासाठी काही मुले कच्या कैऱ्या काढण्यामध्ये मग्न आहेत. तर काही मुले पारंपरिक गोट्यांच्या खेळ खेळण्यामध्ये रमली आहेत.

------------------------
खेळ असा खेळला जातो...
गोट्यांचा हा पारंपरिक खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघामध्ये सहा खेळाडू असतात. विरोधी संघापेक्षा अधिक गोट्या रिंगच्या बाहेर ठोकणे हा मुख्य उद्देश असतो. पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाच्या गोट्या असतात. या खेळामध्ये काठी किंवा दगड वापरून जमिनीवर अंदाजे दोन ते तीन फुटांचे वर्तुळ काढले जाते. सुरुवातीला प्रत्येक खेळाडू दोन गोट्या देतो. खेळाच्या अखेरीस ज्या खेळाडूकडे जास्त गोट्या तोच विजेता ठरतो.
--------------------
एकाग्रतेतून निशाणा
गोट्या हा खेळ मातीतील असला, तरीही संयमीपणा, एकाग्रता या खेळातून दिसून येते. यात चपळपणा, नेम, अचूक निशाणा, ध्येय साध्य केले जाते. यामुळे मुलांमधील मानसिक ताण कमी करण्यास मदत होते, असे तज्‍ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35517 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top