वाकण-पाली-खोपोली निर्विघ्‍न प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकण-पाली-खोपोली निर्विघ्‍न प्रवास
वाकण-पाली-खोपोली निर्विघ्‍न प्रवास

वाकण-पाली-खोपोली निर्विघ्‍न प्रवास

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) ः वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. महामार्गावरील अंबा नदीवरील पुलाचे काम रखडल्‍याने वाहतुकीस अडचणी येत आहेत. मात्र आता प्रकल्‍पामुळे बाधित जमिनींचा वाद सुटला असून भालगूल व जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील नवीन पुलांचे कामही अंतिम टप्प्प्यात आहे. नवीन पूल उंच, रुंद व अधिक क्षमतेचा असल्‍याने पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाणार नाही आणि वाहतूक सुरळीत होऊन प्रवासी, तसेच स्‍थानिकांची गैरसोय दूर होईल.
तीन महिन्यांपूर्वी जांभूळपाडा अंबा नदीवरील एक पूल बनून तयार झाला असून त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. येथील दुसऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच भालगूल येथील दोन्ही पूल मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र पाली अंबा नदीवरील पुलाचे काम थांबले होते. येथील शेतकऱ्यांचा जमीन मोबदला व इतर मागण्यांसाठी एमएसआरडीसी सोबत वाद होता. परिणामी पुलाचे काम रखडले होते. या प्रकरणी पाली पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी एमएसआरडीसी प्रशासन व शेतकरी यांच्यात समेट घडवून आणला. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील जागा देऊ केली.

पावसाळ्यात वाहतूक सुरळीत
पाली अंबा नदीवरील एक पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. त्यानंतर जुना पूल तोडण्यास घेतला जाईल. दुसरा नवा पूल नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. १५ जूनपर्यंत जांभूळपाडा अंबा नदीवरील दुसऱ्या नवीन पुलाचे कामही १०० टक्‍के पूर्ण होईल. भालगूल येथील दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाले आहेत. फक्त एक बाजूचे प्रवेशाचे काम बाकी आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास तेही काम लवकरच पूर्ण होईल.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.


वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग
वाकण-पाली-खोपोली राज्‍यमार्ग चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बेंगलोर महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याचबरोबर विळे मार्गे पुणे आणि माणगावला ही जातो. परिणामी हे तिन्ही पूल पूर्ण झाल्यास वाहतूक सुरळीत होईल.

असे आहेत नवीन पूल
पाली, जांभूळपाडा व भालगूल या ठिकाणी तब्बल २५ कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. पाली अंबा नदीवरील नवीन पुलाची रुंदी १६ मीटर आहे; तर लांबी ११० मीटर आहे. जांभूळपाडा पुलांची रुंदी १६ मीटर, लांबी ७० मीटर आहे. भालगूल पुलांची रुंदी १६ मीटर तर लांबी ५५ मीटर आहे. हे तिन्ही पूल चार लेनचे आहेत. त्यांची भार पेलण्याची क्षमता ७५ टन इतकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35525 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top