
शेवटचे दोन स्वातंत्र्यसैनिक
शेवटचे दोन स्वातंत्र्यसैनिक
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, तर काहींनी आपल्या उमेदीची वर्ष तुरुंगात काढली. रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणांनी या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती. आता यातील फक्त दोघेजण गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत, अशी नोंद रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. उरण कोटनाका येथील रामनाथ सखाराम गायकवाड आणि खालापूर तालुक्यातील रानसई येथील जयंत वामनराव मोरे या दोघांना सरकारकडून हयात असलेले स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन दिली जात आहे. या सर्वांच्या त्यागाने मिळालेल्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत गोवामुक्ती संग्रामात या शेवटचे दोन सैनिकांनी बजावलेली कामगिरी त्यांच्याच शब्दांत...
गोळीबारात जखमी झालेले रामनाथ गायकवाड
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १४ वर्ष गोवा मुक्तीसाठी आंदोलन सुरू होते. परकीय सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी पनवेलचे हिरवे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरातील अनेक तरुण गोवामुक्ती संग्रामात सहभागी झाले होते. यात उरणमधील राष्ट्रसेवा दलाचा प्रमुख म्हणून मी देखील सहभागी होतो. पनवेल येथून पुणे आणि तेथून बेळगावला गेल्यानंतर तिथून सावंतवाडीला चालत गेलो. सावंतवाडीला गेल्यानंतर बाजूच्या एका गावात, मला गावाचं नाव आठवत नाहीये पण तेथे वस्तीला राहिलो. तिथून गोवा सीमेजवळ असलेल्या एका गावातून गोव्यामध्ये घुसलो. गोव्यात घुसल्यानंतर तिथे पोलिसांनी गोळीबार केला. त्या वेळी एक गोळी हिरवे गुरुजींना लागली. गुरूजी खाली कोसळताच त्यांना तत्काळ उचलून पुढे जायला निघालो; पण त्या वेळी ते कासावीस झाले होते. गोळी त्यांच्या छातीला लागल्याने ते हुतात्मा झाले. त्यानंतर दुसऱ्यांदा गोळीबार झाला. तेव्हा रेवदंड्याचे शेषनाथ वाडेकर यांना गोळी लागली. अनेक वर्षांनंतर त्यांना शहीद म्हणून घोषित करण्यात आले. आम्ही जेव्हा पुढे गेलो तेव्हा आमच्यावर लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जमध्ये माझ्या डोक्याला जखम झाली होती. माझ्या हाताच्या मधल्या बोटाला गोळी चाटून गेली होती. सुदैवाने जास्त काही झाले नाही. तरीसुद्धा त्या परिस्थितीत पुढे जात राहिलो. पुढे मग तेरेखोल किल्ल्यात गेलो. आम्हाला तिथेच वस्तीला ठेवण्यात आले. त्यानंतर मग आम्ही हिरवे गुरुजींना घेऊन एका गावामध्ये आलो. लाठीचार्जमध्ये आमच्यातले काही जण दुखापतीमुळे रुग्णालयात गेले होते. त्यानंतर मग तिथे मुक्ती संग्रामात सामील होण्यासाठी जवळपास ४०० ते ५०० स्वातंत्र्यसैनिक जमा झाले. तिथून आम्हाला हाकलण्यात आले. बाहेर काढल्यानंतर सगळे जण जिथे होते त्या ठिकाणी गेलो. मग हिरवे गुरुजींचे प्रेत घेऊन आम्ही अरविंदा या गावातून लॉरीने निघालो. त्यानंतर पनवेलला आलो.
***
कपबशा धुण्यापेक्षा आंदोलनात उडी : जयंत मोरे
माझे वडील पोलिसात नोकरीला होते. सातवीची महत्त्वाची परीक्षा वडिलांची बदली मावळ येथे असताना देत होतो. परीक्षा पुण्याला होणार होती. परीक्षेत नापास झालास, तर हॉटेलमध्ये कपबशा धुवायला ठेवेन, अशी तंबी वडिलांनी दिली होती. परीक्षा पास होण्याची कोणतीच आशा नसल्याने हॉटेलमध्ये कपबशा धुण्यापेक्षा देशासाठी मरण पत्करणे अधिक चांगले, असे म्हणत मी ''विमोचन समिती''चा सदस्य झालो. सेनापती बापट, ना. ग. गोरे, जयंतराव टिळक यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह पुण्यातील अनेक तरुण सहभागी झाले होते. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी गोव्याला रवाना झाली. या तुकडीबरोबर आम्हीही होतो. १८ मे १९५४ रोजी दोडामार्गे आम्ही गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सेनापती बापट, नानासाहेब गोरे यांना पोर्तुगीज सैनिक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना आमच्यासारख्या तरुणांनी प्रखर विरोध केला. पोर्तुगीज सैनिकांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये सेनापती बापट खाली पडले. त्यांच्यावर होणारा लाठीचार्ज वाचवण्यासाठी मी अंगावर पडलो होतो. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना बाजूला केले आणि सेनापती बापटांसह अन्य प्रमुख आंदोलकांना अटक केली. आम्ही त्यांना अटक होण्यापासून वाचवू शकलो नाही. आम्हालाही अटक झाली होती. एका बंद कोठडीत आम्हाला ठेवण्यात आले. त्यानंतर आम्हाला काही दिवसांनी गोव्याच्या सीमेवर आणून सोडण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35529 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..