
वाहतूक कोंडीची समस्या जटील
कर्जत, ता. ११ (बातमीदार) : शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. यात समस्येबाबत तोडगा काढण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अधिकृत रिक्षा स्टँड मिळत नसल्याने मागील काळात रिक्षाचालकांनी त्यासाठी उपोषणे, आंदोलने आणि संघर्ष केला. त्यामुळे संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने सर्व रिक्षाधारकांना शहरातील अधिकृत रिक्षा स्टँडमध्ये सामावून घेण्याचे ठरले. असे असताना आजही अनेक रिक्षाचालक शहरातील रस्त्यांवर रिक्षा लावून वाहतुकीची कोंडी करत आहेत. शिवाय, पादचाऱ्यांनाही रस्त्यावर चालताना अडथळा करत आहेत. मुख्य बाजारपेठेपासून लांब असलेल्या परिसरातील नाक्यावरील अधिकृत रिक्षा स्टँड मात्र रिक्षांविना ओस पडले आहे. तेथे फारच कमी रिक्षाधारक दिसून येतात. त्यामुळे महिला, वयोवृद्ध, रुग्णांना परिसरातून इच्छितस्थळी जाण्यास रिक्षा मिळत नसल्याने त्यांची परवड होत आहे.
--------------------------------------
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. महावीर पेठ ते स्थानक रोड मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू करणार आहे. बाजारपेठेतील दुकानदारांनी बेकायदा लावलेले रस्त्यावरील लोखंडी फलक, दुकानातील विक्रीच्या वस्तू दुकानाबाहेर ठेवण्यास बंदी करण्यात येणार आहे, असे निर्णय बैठकीत झाले.
- सुवर्णा पत्की, पोलिस निरीक्षक, कर्जत
वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षाधारकांसह इतर वाहनांवरही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी. तसेच रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त शहरातील इतर रिक्षा तळांवरूनही रिक्षाधारकांना व्यवसाय करण्यास सूचना कराव्यात. जेणेकरून शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल.
- प्रभाकर गंगावणे, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत
दोन मतप्रवाह ...
काही नागरिकांच्या मते रिक्षाचालकांपेक्षा रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, हातगाड्या, भाजीवाले बसत असल्याने नागरिक गाडी उभी करून खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडते. त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही.
--------
कर्जत : शहरात उभ्या करण्यात आलेल्या रिक्षा.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35534 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..