
वाढत्या उष्म्याने बाजारात शुकशुकाट
पाली, ता. ९ (वार्ताहर) : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. परिणामी, उष्मा प्रचंड वाढल्याने सर्वच बाजारपेठांमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याचा फिरते व रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या दिवसांत कडधान्य, सुकी मासळी आदी अगोटीच्या खरेदीची लगबग पाहायला मिळत. शिवाय, शेतकरी बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीला लागतात. ताडपत्री व इतर सामानांचीही खरेदी केली जाते. मात्र, सध्या प्रचंड उष्मा असल्याने या खरेदीसाठी कोणी बाहेर पडताना दिसत नाही. याचा येथील व्यवसायांवर परिणाम होत आहे. मालाला उठाव नसल्यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे, असे पाली व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत खैरे यांनी सांगितले.
फेरीवाल्यांचे हाल
अनेक आदिवासी महिला गावठी भाज्या, कैऱ्या, आंबे, काजूगर, कोकम, जाम, करवंद आदी रानमेवा विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसतात. लांब गावावरून येत असल्याने शहरात किंवा बाजारात त्यांना कोणतीच सोय नसते. त्यामुळे कित्येक तास त्या उन्हात बसलेल्या असतात. शिवाय, उन्हामुळे ग्राहक बाहेर पडत नसल्याने त्यांच्या मालाची विक्रीही होत नाही, असे लक्ष्मी पवार या आंबा व रानमेवा विक्रेत्या महिलेने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35551 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..