
हक्काच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधव एकवटले
अलिबाग, ता.९ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील नऊ वाड्यांना जोडणारा डांबरी रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदण्यात आला आहे. त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असून नऊ वाड्यांमधील आदिवासी, ठाकूर समाज न्यायासाठी एकत्र आला आहे. स्थानिक पोलिस प्रशासनासह अन्य प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जैतू पारधी, मंगल दरवडा, गणेश पारधी या तीन ग्रामस्थांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी असंख्य आदिवासी, ठाकूर समाज एकवटला आहे.
कर्जत तालुक्यातील बेडीसगावच्या परिसरात शाळेची वाडी, कुंडवाडी, आंबेवाडी, कोथेरी वाडी, वायाची वाडी, तळे वाडी, बोरीची वाडी, गावठाण वाडी, वाघिणीची वाडी एक, वाघिणीची वाडी दोन अशा एकूण नऊ वाड्या आहेत. या वाड्यांमध्ये आदिवासी व ठाकूर समाज असून लोकसंख्या दोन हजारांहून अधिक आहे. वाड्यांमध्ये जाण्या-येण्यासाठी असलेला रस्ता वांगणी येथील अमोल शेलार व इतर व्यक्तींनी जेसीबीच्या साह्याने खोदल्याचे जैतू पारधीसह अन्य आदिवासी व ठाकूर समाजाचे म्हणणे आहे.
रस्ता खोदल्याने नऊ वाड्यांचा संपर्क तुटला आहे. याप्रकरणी त्यांनी नेरळ पोलिस ठाण्यात धाव घेतली; परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत कर्जत येथील तहसीलदार कार्यालयासमोर ४ एप्रिल रोजी उपोषण सुरू केले होते. त्या वेळी तहसीलदारांनी रस्ता पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. या नऊ वाड्यांमधील ग्रामस्थांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोठावले असून आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नऊ वाड्यांमधील आदिवासी समाज याच रस्त्याचा उपयोग करतो. खोदकाम केल्याने वर्दळीत अडचणी येत असून आदिवासी बांधवांची गैरसोय होत आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आहोत.
- मंगल दरवडा, उपोषणकर्ते.
नऊ गाव-वाड्यांमधील रस्त्याचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आहे. आदिवासी बांधवांच्या उपोषणाबाबत जिल्हा परिषदेला कळविण्यात आले आहे. याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी या विभागाची आहे.
- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35562 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..