
जिल्हा रुग्णालयाची दुरुस्ती संथ गतीने
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : मोडकळीस आलेल्या रॅम्पमुळे जिल्हा रुग्णालयात केव्हाही अपघात होण्याची शक्यता होती. या गंभीर समस्येकडे प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने रॅम्पचे (घसरता जीना) काम तातडीने सुरू केले. सद्यस्थितीत हे काम संथ गतीने सुरू असल्याने पुढील सहा महिने तरी होईल की नाही, याबाबत शंका आहे. गंभीर बाब म्हणजे इमारतीमधील लिफ्टच्या आवारात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे लिफ्ट बंद ठेवावी लागते. पावसाळ्यादरम्यान रॅम्प आणि लिफ्ट बंद राहिल्यास रुग्णांना पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर न्यायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्ण येत असतात. पावसाळ्यात पाणी साचत असल्याने लिफ्ट बंद असते. त्यामुळे ज्या रुग्णांना चालता येत नाही, त्यांना वॉर्डपर्यंत नेण्यासाठी घसरत्या जीन्यावरून स्ट्रेचरद्वारे वरच्या मजल्यापर्यंत नेले जाते. मात्र, सरकता जीना नादुरुस्त झाल्याने त्याला लोखंडी पाईपाचा टेकू दिला होता. त्याच जीन्याखाली रुग्णांचे नातेवाईक रात्रीच्या वेळेस झोपलेले असायचे. याच दरम्यान दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती होती. यावर प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवल्यावर त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजीव डोंगरे यांनी हा जीना मुख्य इमारतीशी जोडल्यामुळे तो तोडताना काळजीपूर्वक काम करावे लागते. नवीन जीन्याचे काम पावसाळ्यात पूर्ण होण्याची शक्यता कमी असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागामार्फत करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी रुग्णालयासाठी मध्यंतरी सुमारे १० कोटी रुपये नूतनीकरणासाठी खर्च केला आहे. मात्र, तरीही येथील सुरक्षेत कोणताही बदल झाला नाही. नादुरुस्त इमारतीमध्ये रुग्णांसह येथील कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक वावरत आहेत. दरम्यान, रॅम्पचे काम संथ गतीने होत असल्याने पावसाळ्यादरम्यान रुग्णांना पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर नेण्याची समस्या येणार आहे.
***
कोरोनाकाळात आरोग्य व्यवस्थेसाठी अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात विविध सोयी-सुविधा दिल्या आहेत. मात्र, मनुष्यबळाची कमतरता असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. तसेच शवागृहाची झालेली दुरवस्था, इमारतीचा तोडण्यात आलेला जीना, इमारतीला पडलेला खासगी वाहनांचा विळखा अशा विविध समस्येने जिल्हा रुग्णालय ग्रासले आहे. यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते, अलिबाग
***
सिव्हिल रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम दीड कोटीचे आहे. हे काम महेंद्र रिॲलिटीज मुंबई करत आहेत. यातच या जीन्याची दुरुस्ती आहे. पावसाळ्यात तळमजळ्यावर पाणी साचत असल्याने लिफ्ट बंद ठेवावी लागते. अशा परिस्थितीत जीन्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत.
- राजीव डोंगरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35563 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..