पाण्याच्या दुर्भिक्षामुळे रोपवाटिकांची होरपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे रोपवाटिकांची होरपळ
पाण्याच्या दुर्भिक्षामुळे रोपवाटिकांची होरपळ

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे रोपवाटिकांची होरपळ

sakal_logo
By

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १० : तब्बल दोन वर्षांनी आता कुठे रोपवाटिकाधारकांचा व्यवसाय बहरत होता. मात्र, जिल्ह्यातील तापमानात दिवसागणिक वाढ होत असून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्‍याचा परिणाम रोपवाटिकांची होरपळ होत आहे. व्यावसायिकांची रोपे वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. शिवाय, विक्रीतही घट झाली आहे. यात नुकसान होत असल्याने रोपवाटिकाधारक (नर्सरी) चिंतेत आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोपवाटिका व्यवसाय चांगला बहरला आहे. येथून वर्षाला काही कोटींचा व्यवसाय होतो. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाला सुरुवात झाल्यावर शेतकरी, बागायतदार आणि निसर्गप्रेमी यांची रोपे खरेदीसाठी लगबग सुरू होते. आपल्या शेतात, फळ-फुल बागांत आणि परसबागेत लावण्यासाठी रोपवाटिकांमधून रोपे व लॉन खरेदी करतात. त्यात फळ आणि फुलझाडांना खूप मागणी असते. तसेच इतर मोसमातही रोपवाटिका नानाविध रोपांनी सजलेल्या असतात. सध्या वाढत्या उष्म्यात रोपांना जगवणे अवघड होऊन गेले आहे. तलाव, कूपनलिका, नैसर्गिक व कृत्रिम पाणीसाठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. रोपवाटिकेतील रोपांना पाणी उपलब्ध करून देताना प्रचंड धावपळ करावी लागत आहे. प्रचंड उष्मा, त्यात पाण्याच्या कमतरतेमुळे ही रोपे कोमेजून गेली आहेत. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे.

देखभालीसाठी अतिरिक्त खर्च
अनेक रोपवाटिकाधारक पाण्याची व्यवस्था करतात; मात्र वाढत्या उकाड्यामुळे झाडांना अधिक पाणी लागते. काही वेळेला टँकरने विकतचे पाणी आणावे लागते. मुबलक पाणी मिळाले नाहीतर रोपे कोमेजतात किंवा मरतात. रोपांना अतिरिक्त पाण्याची मागणी असूनही ती भागविता येत नाही. अशा वेळी रोपवाटिकाधारकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. काही वेळेला अधिकचे पाणी देण्यासाठी आणि झाडांची निगा राखण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागते. रोपांवर ग्रीननेट किंवा कापडी छत लावावे लागते. अशा प्रकारे रोपांच्या देखभालीसाठी अधिक पैसे व श्रमदेखील द्यावे लागते.

रोपे आणि विक्रीवर परिणाम
वाढत्या उष्म्यामुळे खूप पाणी देऊनही रोपे ताजी वाटत नाहीत. मरगळलेल्या आणि मलूल झालेल्या रोपांची विक्री होत नाही. कमी पाणी आणि वाढती गरमी यामुळे रोपांची वाढ खुंटते. किंबहुना त्यांची मर जास्त होते. बरीच रोपे प्लास्टिक पिशवीत असल्यामुळे पाणी लगेच खेचले जाते. तसेच, ऊन असल्याने पिशवीसुद्धा लवकर सुकते. याचे रोपवाटिकाधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

--------------------
पाण्याची कमतरता, वाढता उकाडा यामुळे रोपे जगवणे व टिकविणे खूप अवघड होत आहे. अशा कारणांनी उन्हाळ्यात नवीन माल आणत नाही. मात्र, उपलब्ध रोपांना जगवणे आव्हान आहे. पाणी जास्त लागल्यामुळे वेळ आणि खर्च अधिक होतो.
- अमित निंबाळकर, मालक, ग्रीनटच नर्सरी, पाली

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35573 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top