नांदगाव समुद्रकिनाऱ्याची झाली कचराभूमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगाव समुद्रकिनाऱ्याची झाली कचराभूमी
नांदगाव समुद्रकिनाऱ्याची झाली कचराभूमी

नांदगाव समुद्रकिनाऱ्याची झाली कचराभूमी

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) ः पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या मुरूड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनारी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. किनाऱ्यावर ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचरा पडला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून पर्यटकांनीही किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पर्यटनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे नांदगावचा किनारा कचराभूमीचे ठिकाण बनू लागला आहे.
रायगड जिल्ह्याला विस्‍तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून किनारपट्टीवर नारळी-पोफळीची झाडे आहेत. अलिबागसह नागाव, काशीद, मुरूड या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांकडून नेहमीच पसंती मिळते. सुटीच्या हंगामात पर्यटक समुद्रकिनारी प्रचंड गर्दी करतात. पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्‍ध झाली आहे. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांसह रायगड जिल्ह्यातील सागरी सुकी, ओली मासळीवर खवय्ये ताव मारतात. पर्यटनावर अवलंबून रोजगारामुळे जिल्ह्यात सात कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते.
काशीद, मुरूडजवळच नांदगाव आहे. या गावालगत सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या नांदगावमध्ये सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. काशीद, मुरूडमध्ये येणारे पर्यटक या सिद्धीविनायकाच्या मंदिराला आवर्जून भेट देतात. तसेच नांदगावच्या समुद्रकिनारी सकाळ व सायंकाळी स्थानिक पर्यटक फिरण्यास येतात. मात्र या समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी कचरा पडला आहे. प्लास्‍टिक बाटल्यासह पिशव्या, घाणीचे ढीग साचले आहे.
समुद्रकिनारी येणारे पर्यटक कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. अनेक वेळा पर्यटकांना नाक दाबून या ठिकाणांहून प्रवास करावा लागतो, स्थानिक प्रशासनाचेही त्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे पर्यटकांचे म्‍हणणे आहे.

कठड्याची दयनीय अवस्‍था
किनाऱ्यापर्यंत जाईपर्यंत सुमारे २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा कचरा पडला आहे. या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. किनारी बांधण्यात आलेल्या कठड्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही भाग तुटला आहे. त्याच्या दुरुस्तीकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे.

नांदगाव समुद्र किनारी घनकचरा व्यवस्थापनासाठी क्रशर मशीन उपलब्ध केली आहे. किनारी भागात कचरा न टाकण्याबाबत नागरिकांना आवाहन केले जाते. तरीही काही मंडळी कचरा टाकतात. या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने कचरा उचलण्याचा प्रयत्न असून परिसरात कचरा अस्ताव्यस्त पडू नये यासाठी ट्रॉली ठेवण्यात येणार आहे.
- जी. के. म्हात्रे,
ग्रामविकास अधिकारी, नांदगाव.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35577 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top