खरिपाला महागाईच्या झळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरिपाला महागाईच्या झळा
खरिपाला महागाईच्या झळा

खरिपाला महागाईच्या झळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ : यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याने खरिपाच्या पूर्वतयारीला रायगड जिल्ह्यात वेग आला आहे. बी-बियाणे खरेदी, शेतीची अवजारे, खतांची खरेदी, मजुरांसाठी खर्च किती येईल, याचा अंदाज शेतकरी बांधू लागले आहेत; मात्र महागाईमुळे शेती खर्चातही कमालीची वाढ झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा शेतीखर्चात ४० ते ५० टक्के वाढ होण्याची शक्यता असून यात पारंपरिक पद्धतीने भात लागवड करणारा शेतकरी भरडला जाण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा खरीप हंगामात १ लाख ५ हजार क्षेत्रावर भात लागवड होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वास्तविक गतवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ५ हजारांनी कमी झाले आहे. वाढत्या महागाईमुळे अनेक शेतकऱ्यांना लागवड करणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्याचाच परिणाम शेतीखर्चावरही झाला आहे.
दरवर्षी शेतमजुरांअभावी लागवड वेळेत होत नसल्‍याने शेतीचे नुकसान होते, त्याचबरोबर कापणी, मळणी यांसारख्या खर्चातही वाढ होणार असल्‍याने जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याला शेती करणे शक्य होणार नाही. सिंचनाचा अभाव असल्याने पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांत शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चात मागील काही वर्षांपासून मोठी वाढ झाली आहे; मात्र तुलनेने येणाऱ्या उत्पन्नात वाढ झालेली नाही.
जिल्‍ह्यातील जवळपास ४० टक्‍के शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करणे सोडले आहे. शेती खर्चातील वाढीमुळे त्‍यात आणखी २० टक्‍के वाढ होण्याची शक्‍यता आहे. वाढलेल्या शेतीखर्चामुळे शेती सोडणाऱ्यांमध्ये आणखी २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळेही डोंगराळ भागात भातशेती करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. रायगडमध्ये अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्‍त असल्‍याने त्‍यांना वाढीव शेतीखर्च परवडणारा नाही. त्‍यामुळे यंदा भात लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिकाखाली क्षेत्र - हेक्‍टरमध्ये
पीक/ २०२०/२१/२२
भात /१,०४, ६०० / ९६,२००/९४,४३६
नागली/६,७५५/४,६८६/३,७६०
तृणधान्य/४,६००/३,३००/ २,९००
पेरणीचे नियोजन/१,१८,३९५/१,१०,२८७/ १,०५२७६

मागील काही वर्षांपासून रायगडमधील लागवडीखालील क्षेत्र कमी आहे. यास अनेक कारणे आहेत. यंदा त्‍यास महागाई कारणीभूत असू शकते. ज्या जमिनीमध्ये मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी, अशा जमिनी ओसाड राहत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आता कमी श्रम, खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्‍यामुळे विविध पिकांखालील क्षेत्र कमी झाले असले तरी प्रत्यक्ष उत्पन्नात वाढ झालेली दिसते.
- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक.

नांगरणी करण्यासाठी एका दिवसासाठी एका नांगराची मजुरी ६०० रुपयांपर्यंत होती, यंदा ती १,००० रुपये इतकी वाढली आहे. त्याचबरोबर बी-बियाणे यांच्याही किमती वाढल्या आहेत. मजुरी ३० टक्क्यांनी वाढल्‍याने वाढीव खर्चामुळे एकट्याने पारंपरिक भात शेती करणे शक्य होत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पिकांसह आधुनिक तंत्राचा वापर करून गटशेती केल्यास अधिक किफायतशीर ठरू शकेल.
- गणेश भगत, अध्यक्ष, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35596 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top