
सीएसआरमधून मिळालेली पुस्तके रात्री रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ : रायगड जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसह येथील कंपन्या आपल्या सामाजिक दायित्व फंडातून विविध साहित्य जिल्हा परिषदेला देत असतात. हे साहित्य आरोग्य विभाग, महिला आणि बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून ते शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहचवावे लागते. मात्र, याचे कोणतेही सोयरसुतक नसलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमुळे या वस्तू लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचा संतापजनक प्रकार रायगड जिल्ह्यात यापूर्वी अनेकवेळा घडला आहे. असाच प्रकार मंगळवारी जिल्हा परिषद इमारतीसमोर दिसून आला. महिला व बाल विकास व आरोग्य विभागाची नवीन पुस्तके रात्री रस्त्यावर ठेवल्याची बाब येथील दक्ष नागरिकांनी उघड केली.अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीच्या बाजूला रस्त्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास नवीन पुस्तकांचे गठ्ठे पडले होते. कोविडच्या साथीमध्ये लहान मुलांची घ्यावयाची काळजी, सूचना इत्यादी बाबतची ही पुस्तके असल्याचे प्राथमिक दृष्टया दिसून आले. कोरोना काळात सरकारने प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र जनजागृतीपर ही पुस्तके रात्री रस्त्यावर निष्काळजीपणे ठेवल्याने अधिकाऱ्यांना शासनाच्या पैशाची किंमत नाही, अशी टीका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बालसंगोपनाची माहिती संकलित करण्यासाठी ही पुस्तके पाठवण्यात आली होती. तालुक्यांना ही पुस्तके वितरित करण्यात आली होती. इतर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी ही पुस्तके नेली आहेत. ज्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी ही पुस्तके रात्रभर रस्त्यावर ठेवली, त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35601 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..