
कांदळवनाच्या संवर्धनासाठी अॅपल कंपनीची धाव
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ : सागरी पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या खारफुटी जंगलाच्या संवर्धनासाठी रायगड जिल्ह्यातील स्थानिकांना अॅपल कंपनी मदत करणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अॅपल कंपनीने हा निर्णय घेतला आहे. खारफुटीच्या संवर्धनासाठी कंपनीने अप्लाइड एनव्हॉरमेंटल रिसर्च फाऊंडेशन अर्थात एईआरएफला आर्थिक साह्य केले आहे. प्राथमिक स्तरावर उरण आणि पनवेल या तालुक्यांतील खारफुटीचे सर्व्हेक्षण करून त्या ठिकाणी कांदळवनातून स्थानिकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील उरण, पेण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये कांदळवनाचे प्रमाण सुमारे २ हजार ४०० हेक्टर इतके आहे. हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वोच्च न्यायालयाने खारफुटी तोडीला बंदी आणल्याने अनेक शेतकऱ्यांची पिकती जमीन कांदळवनाने नापिक होत आहे. उत्पन्नाचे साधन गमावलेल्या शेतकऱ्यांना कांदळवनातून उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वन विभागाकडून काही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. अॅपल कंपनीकडून मिळणाऱ्या सामाजिक दायित्व निधीतून निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती रायगड जिल्ह्याच्या वन विभाग कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली. पृथ्वीवरचे नागरी जीवन दीर्घकाळ सुरक्षित राहावे याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे. याच विचारातून कंपनी काम करत असल्याचे अॅपल कंपनीच्या पर्यावरण, धोरण आणि सामाजिक उपक्रम या विभागाच्या उपाध्यक्षा लिसा जॅक्सन यांनी सांगितले.
***
पर्यावरणीय महत्त्वामुळे कांदळवन तोडण्यावर कायद्याने बंदी आहे. अशा कांदळवनाने जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी उपजीविकेची साधने निर्माण करून दिली जात आहेत. उपजीविकेची साधने योग्य वेळेत उपलब्ध करून न दिल्यास शेतकऱ्यांच्या मालकी जमिनीवरील कांदळवनाचा ऱ्हास होण्याची जास्त शक्यता आहे. यासाठी स्थानिक महिलांच्या बचतगटांना ९० टक्के अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. वेगवेगळी उपजीविकेची साधने त्यांच्यासाठी निर्माण करून दिली जात आहेत. वेगवेगळ्या कंपन्या कांदळवनाच्या संवर्धनासाठी धावून येत असून वन विभागाच्या माध्यमातून या उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले जात आहे.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष, वन विभाग रायगड
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35616 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..