शुष्क बागेचा ट्रेंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुष्क बागेचा ट्रेंड
शुष्क बागेचा ट्रेंड

शुष्क बागेचा ट्रेंड

sakal_logo
By

अमित गवळे ः पाली
मुंबई-पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्‍या रायगड जिल्ह्यात हजारो फार्महाऊस उभे राहत असून अनेकांनी इथे सेकंड होम बांधले आहेत. याठिकाणी नारळी-सुपारीच्या बागा, आंबा-काजूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र गेल्‍या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानही भरपूर झाले आहे. त्‍यामुळे आत परसात किंवा घराच्या कोपऱ्यात, मोकळ्या जागेत, कमी पाण्याच्या ठिकाणी शुष्क बागेला (Desert Garden) पसंती मिळत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटचालक तसेच स्‍थानिकही शुष्क बाग आवर्जून बनवून घेत आहेत. अतिशय आकर्षक, कमी वेळ, खर्च, जागा आणि कमी पाण्यामध्ये हा बगीचा घराची शोभा वाढवितो.
विशेषतः दगडगोटे आणि रेतीचा सर्वाधिक वापर शुष्क बगीचा बनविण्यासाठी होतो. जिथे झाडांना पाणी देणे अडचणीचे असते तिथे हा प्रयोग केला येतो. बाजारात किंवा नर्सरीत असे दगडगोटे, खडी-रेती मिळते. पाणी कमी असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचे साहित्य व झाडे वापरून सुरेख शुष्क बाग तयार करता येते.
जंगलातील मोठे दगड, नदीतील सागरगोटे, रेती, रंग आणि जुनी सुकलेली मुळे याचा वापर करून ही बाग सुंदर सजवता येते. त्‍यासाठी खर्चही कमी येतो. वेगवेगळे आकार देऊन किंवा एखादी थीम घेऊन शुष्क बगीचा साकारता येतो. सागरगोटे, खडी, रेतीला रंग देऊन घराचा एखादा कोपरा सजवला तर चटकन लक्ष जाईल, असे काम यात करता येते. ठळकपणे दिसणारे डिझाईन तयार केले तर बागेला एक वेगळा टच मिळतो. कातळ असले तरी त्‍या जागीही शुष्क बगीचा साकारता येतो.

शुष्क किंवा खडीची बाग ही एक प्रकारची दगडी रचना आहे. ही संकल्पना कमी झाडे आणि विविध सामग्रीच्या वापरावर आधारित आहे. शुष्क बाग तयार करण्याचे तंत्रज्ञान अगदी सोपे असले तरी कल्पकता व तज्‍ज्ञांची गरज लागते. कमी वेळेत, खर्चात व जागेत ती साकारता येते. त्यामुळे जिल्ह्यात सध्या अनेक जण शुष्क बागेला पसंती देत आहेत.
- अमित निंबाळकर, लँडस्केप तज्‍ज्ञ.


अतिशय आकर्षक व विविध प्रकारांत शुष्क बगीचा बनवता येतो. यासाठी जागा आणि खर्च कमी लागतो, शिवाय फार देखभालीची गरज नसते. बगीचाची हौस व छंदसुद्धा पूर्ण होतो आणि घराची शोभाही वाढते. त्‍यामुळे बागकाम करणारे शुष्क बगीच्याचा पर्याय सुचवतात.
- राजीव खन्ना, कुंभारघर, सुधागड

बागेचे फायदे
- शुष्क बाग स्थानिक परिसरात कुठेही तयार करता येते. बागेच्या लँडस्केपिंगसाठी स्टेपी गवत व रोपे लावली जातात, ज्याला वारंवार पाणी घालण्याची गरज नसते.
- बागेचे क्षेत्र लहान असल्याने देखभाल करणे सोपे जाते. इतर बागा नेहमी आकर्षक दिसण्यासाठी तेथील झाडांना वेळोवेळी पाणी, खत व लक्ष द्यावे लागते. मात्र शुष्क बाग तयार झाली की ती खूप दिवस आकर्षक दिसते.
- सतत देखभालीचीही गरज नसते. हवामानाच्या अनिश्चिततेचा त्‍यावर फार परिणाम होत नाही. उष्णता आणि मुसळधार पाऊसही बागेची रचना नष्ट करू शकत नाही. कमी खर्चामुळे कमी गुंतवणुकीची आवश्यकता असते.
- विशेषत: स्वस्त, घरगुती साहित्य वापरले जाते. बगीच्यात कोणतेही इतर तण, झुडूप वाढत नाही. त्यामुळे देखभालीचा खर्चसुद्धा नाही. आवश्यक असल्यास, दुसऱ्या ठिकाणीही हलवता येते.

तापमान समतोल
बगीच्यातील दगड हे रोप, गवत व झाडांच्या मुळांचे रक्षण करतात. शिवाय शुष्क बगीचा हिवाळ्यात उबदार असतो आणि उन्हाळ्यात थंड असतो. ज्यामुळे रोपे, गवत व झाडे सुरक्षित राहतात.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35629 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top