बहरली मोहाची झाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहरली मोहाची झाडे
बहरली मोहाची झाडे

बहरली मोहाची झाडे

sakal_logo
By

हेमंत देशमुख, कर्जत
मोहाचे फुल म्हटले की पहिल्या धारेची थोडक्यात दारू बनवण्यासाठी उपयोग असा समज होता. मात्र, प्रत्यक्षात दारू व्यतिरिक्तही मोहाच्या झाडाची अधिक वैशिष्ट्ये आहेत. मोहाच्या झाडाची फुले, फळे, फळांच्या बियापासूम निघणारे तेल, वनऔषधी पाने अशा या सर्वगुण संपन्न झाडापासून आदिवासी बांधवांना चार पैसेही मिळत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचीही सोय होते. हे झाड त्यांच्यासाठी कल्पवृक्षच ठरत आहे. उन्हाळ्यात या झाडांना बहर येत असल्याने सध्या कर्जतच्या जंगल भागात मोहाच्या फुलांचा घमघमाट सुटला आहे.

सध्या उन्हाळा सुरू आहे. वनौषधी वृक्षांना बहर आला आहे. मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. कर्जतच्या जंगलात मोहाची झाडे आढळतात. त्याची फुले, फळे, पाने, साल, लाकूड, मुळे, फांद्या या सर्व अवयवांचा उपयोग होतो. हा डेरेदार वृक्ष असून ४० ते ६० फूट उंच वाढतो. तर ६० ते ७० वर्षांपर्यंत जगतो. गाभ्यातील लाकूड लालसर तपकिरी असते. या झाडाचे लाकूड खूप कठीण व सरळ असते. मोहाचे झाड कर्जत तालुक्यातील आदिवासींचा कल्पवृक्ष समजला जातो. विशेष म्हणजे मोहाची फुले रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत ''ब'' जीवनसत्त्व, साखर आणि ६७.९ टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. कोणत्याही आजारात या दारूचा औषध म्हणून ते उपयोग करतात. . मात्र, सद्यस्थितीत प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे हा कल्पवृक्ष नामशेष होतो की काय, अशी चिंता आदिवासींना वाटत आहे.

विविधांगी उपयुक्त
मोहाच्या बियांचे तेलही काढले जाते. आदिवासी भाजी आणि दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे. या तेलाचा त्वचारोग व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत उपयोग करण्यात येतो. तसेच, मेणबत्ती बनविण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवतात. या पेंडीचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून शेतात केला जातो. पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात. त्यामुळे पिकांची वाढ अधिक चांगली आणि जोमाने होते. पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात. सर्पदंशावरही पेंडीचा रामबाण उपाय आहे. या झाडाच्या पानांपासून द्रोण व पत्रावळी तयार केली जातात
-----------------------------------------------------------------------------
विदेशी दारूचा दर्जा
एप्रिल महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोहाच्या फुलापासून बनणाऱ्या दारूला विदेशी दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आधी या दारूला देशी दारूचा दर्जा होता. मात्र, जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी येत होत्या. आता यापुढे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू विदेशी दुकानात मिळणार आहे.
--------------------------------------------------------------------------

कर्जत : तालुक्यात बहरलेली मोहाची झाडे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35635 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top