
वादळाच्या तडाख्यातून वाचणार शासकीय इमारती
अलिबाग, ता. १७ (बातमीदार)ः दोन वर्षांपूर्वी निसर्ग चक्री वादळात घरांसह शासकीय इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. या संकटानंतर जिल्हा परिषदेने धडा घेत वादळाचा धोका पचविणाऱ्या शासकीय इमारती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व शासकीय इमारतीची कामे गुणवत्तापूर्वक करण्याचे लेखी आदेश जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व साहाय्यक अभियंता यांना देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्री वादळ आले होते. यात अवघ्या तीन तासांत हजारे झाडे उन्मळून पडली. घरांसह शासकीय इमारतींचे पत्रे उडाले, भिंती कोसळल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांसह अन्य इमारतींच्या भिंती कोसळल्या होत्या. निसर्ग चक्री वादळाप्रमाणेच २०२१ मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तौक्ते चक्री वादळाने नुकसान झाले. या वादळानंतर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या इमारती वादळाचा धोका पचविणाऱ्या असाव्यात, अशा बनविण्याचा निर्णय घेतला. यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अंगणवाड्या, शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम वादळापासून बचावासाठी गुणवत्तापूर्वक करण्याचे आदेश देण्यात आले असून नियोजनाच्या लेखी सूचना गटविकास अधिकाऱ्यांसह, बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, साहाय्यक अभियंता यांना देण्यात आले आहेत.
अशा पद्धतीने होणार बांधकाम
शासकीय इमारतीचे नवीन बांधकाम करताना इमारतीवर पत्र्यांचे शेड करून त्यांना दोन फुटाचे सन ड्रॉप्स काढावे. जेणेकरून पावसाचे पाणी टेरेस स्लॅबवर पडणार नाही. तसेच वादळ आल्यास, वारा आतमध्ये जाऊन पत्रे उडण्याची शक्यता कमी राहील. इमारतींच्या दरवाजे, खिडक्यांवर उतार देण्यात येणार आहे.
वादळापासून रक्षणाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्वक इमारती बांधण्याबरोबरच वादळाच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी उतार करून इमारतींना पत्रे बसविण्यात येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापद्धतीने बांधकाम करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- के. वाय. बारदेस्कर,
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35669 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..