दरडींची पुनरावृत्ती टाळणे आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरडींची पुनरावृत्ती टाळणे आवश्‍यक
दरडींची पुनरावृत्ती टाळणे आवश्‍यक

दरडींची पुनरावृत्ती टाळणे आवश्‍यक

sakal_logo
By

कर्जत, ता. १८ (बातमीदार) : मागील काही वर्षांमध्ये निसर्गाचा कोप होऊन कर्जतमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावांना आणि लोकवस्तींना फटका बसला होता. यात पाण्याचा प्रवाह रोखला गेल्याने पुराचा फटकाही गावांना बसला. नैसर्गिक पाण्याचा मार्ग वेगवेगळ्या भरावामुळे, नव्याने सुरू असलेल्या रस्त्याच्या विकास कामांमुळे, तसेच अन्य विकास कामांमुळे बंद झाला आहे. वस्त्यांवर डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तीच पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, यासाठी नियोजन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कर्जत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी माजी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने पाणी लोकवस्तीत शिरून अतोनात हाल होत आहे. याबाबत झालेल्या नुकसानीची आणि निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची सरकारकडून पाहणी करण्यात आली होती. त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही अथवा योग्य मोबदला दिला नाही. केवळ नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी या वेळी केला आहे. दरवेळेस अशा प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर येत असेल, तर प्रशासकीय अधिकारी करतात तरी काय? दुर्घटना घडण्यापूर्वी यावर उपाययोजना का केली जात नाही? ज्या प्रमाणे महाडमध्ये दुर्दैवी घटना घडली होती. त्यामध्ये अनेकांचे जीव जमिनीत गाडले गेले, त्याप्रमाणे घटना घडण्याची वाट बघत आहे का? असा संताप त्‍यांनी व्यक्त केला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीही ९९ टक्के पर्जन्यवृष्टी होणार आहे. पावसाळा जवळ आला, तरी याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्जत ते खालापूर मधल्या गावांच्या नियोजनाबाबत आर्थिक तरतूद, किती ठिकाणी संरक्षक भिंती सुचविल्या आणि येणाऱ्या आपत्तींबाबत कोणते नियोजन केले, याबाबत सविस्तर बैठक जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घ्यावी, असे निवेदनाद्वारे लाड यांनी मागणी केली आहे.

साठवण टाक्यांनाही धोका
कर्जत येथील तहसील कचेरीच्या शेजारी, भिसेगाव परिसरात टेकडीमध्ये आणि दहिवली येथील कोकण ज्ञानपीठामागे पाण्याची टाकी आहे. त्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. अशा टेकड्यांची मातीसुद्धा खणून काढली आहे. त्यामुळे भविष्यात त्या टेकड्या कोसळून जीवितहानी होऊ शकते. या टेकड्यांखाली नागरी वस्ती असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास माती ढासळून साठवण टाकीलाही धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी, याखाली राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे.

---------------------------------------------------------------

दरवर्षी काही ना काही दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत; मात्र त्यांचे कागदी पंचनामे केले जाते. प्रत्यक्षात नुकसानीप्रमाणे मोबदला दिला जात नाही. अशा आपत्तीच्या घटना वारंवार होऊ नये, यासाठी संभाव्य धोका ओळखून अगोदरच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- सुरेश लाड, माजी आमदार
-----------------------------------------------------------

पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीबाबत कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना सूचना देतो.
- डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35709 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top