महामार्गाबाधित शेतकरी मोबदल्‍याच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गाबाधित शेतकरी मोबदल्‍याच्या प्रतीक्षेत
महामार्गाबाधित शेतकरी मोबदल्‍याच्या प्रतीक्षेत

महामार्गाबाधित शेतकरी मोबदल्‍याच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

कर्जत, ता. १९ (बातमीदार)ः कर्जत-कल्याण महामार्गासाठी हाळ फाटा-पळसदरीदरम्‍यान शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्‍या असून रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही, ते शेतकरी आक्रमक झाले आहेत. जो पर्यंत मोबदला मिळत नाही, तो पर्यंत आमच्या जमिनीवर रस्त्याचे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका त्‍यांनी घेतली आहे. याबाबत माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून न्याय न मिळाल्यास जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
कर्जत-खालापूरला जोडलेला जुना राज्य मार्ग शहापूर-मुरबाड, कर्जत-हाळ, कर्जत-कल्याण महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित केल्‍या आहेत, त्‍यांना योग्‍य मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने लाड यांनी केली आहे.
खोपोली फाटा तसेच चौक-शहापूर, मुरबाड-कर्जत-हाळ फाटा खोपोली, तसेच चौक-कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग हा रस्ता २०११-२०१२ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने चौपदरीकरण व सुधारणा करण्यासाठी घेतला. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भूसंपादित झालेला शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही, तरी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणास सहकार्य दाखवले. त्यामुळे रस्त्याचे जवळपास ८० टक्‍के काम पूर्ण झाले. तसेच रस्ता शासनाने राष्ट्रीय महामार्ग ५४८ - अ घोषित करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गाकडे वर्ग केला आहे.
रस्त्याच्या कामात ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास अडथळा निर्माण केला आहे त्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्‍याचे लाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्‍यांनी योग्य सहकार्य केले असून डांबरीकरणाला संमती दिली आहे. शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी एमएमआरडीए आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे.
- रमेश खिस्ते, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

पळसदरी भागातील ज्या शेतकऱ्यांची महामार्गामध्ये जमीन गेली आहे, त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि एमएसआरडीए आणि एमएमआरडीसी कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. तसेच जागा मालकांच्या बैठका घेऊन त्यांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
- महेंद्र थोरवे, आमदार, कर्जत

२०१२ पासून कोणताही मोबादला मिळालेला नाही. त्यामुळे प्रथम मोबादला देण्यात यावा तरच सिमेंटकाँक्रिटीच्या रस्‍त्‍याचे काम करण्यास संमती देऊ.
- प्रवीण हडप, शेतकरी, नावंधे