
सात तालुक्यांना टँकरचा आधार
अलिबाग, ता. १९ (प्रमोद जाधव) ः रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांत फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. हे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अलिबागसह खालापूर, पेण, महाड, सुधागड, पोलादपूर, श्रीवर्धन या सात तालुक्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या तालुक्यांची तहान भागविण्यासाठी २३० ठिकाणी २७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये तीन हजार मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो. तरीही दरवर्षी मार्चपासूनच अनेक गावे, वाड्यांमध्ये दुष्काळ सुरू होतो. जिल्हा टॅंकरमुक्त करण्याच्या घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून पाण्याच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. यात नळ पाणीपुरवठा योजनेसह पावसाचे पाणी साठवण करण्यासाठी झिंक टाकी प्रकल्प अशा अनेक योजना राबवून टंचाईची दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र जिल्ह्यातील नागरिकांना मार्चपासूनच पाण्यासाठी वणवण करावी लागते.
जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली. सुरुवातीला अलिबाग तालुक्यातील दोन गावांमध्ये समस्या निर्माण झाली. त्यानंतर मार्च महिन्यात पेण तालुक्यात पाणी संकट सुरू झाले. जिल्ह्यातील धरणांमध्ये साचलेला गाळ, प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव, पाण्याचा अपव्यय आदी कारणांमुळे जिल्ह्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
फेब्रुवारीपासून आतापर्यंत रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, खालापूर, महाड, सुधागड, पोलादपूर या सात तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. जवळपास ४१ गावे, १८९ वाड्यांमध्ये २७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पेण तालुक्यात १२, तर महाड तालुक्यात ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
दुष्काळग्रस्त गावे-वाड्या
तालुके - गावे - वाड्या - टॅंकर
अलिबाग - ४ - ००- २
खालापूर - ६- ४ - २
पेण - १९ - १०० - १२
महाड - ११- ६८ - ०८
सुधागड - ०- ३ - १
पोलादपूर - ०- ११- १
श्रीवर्धन - १- ०३- ०१
सरकारी टॅंकरचा अभाव
जिल्ह्यात पूर्वी टंचाईग्रस्त गावांत सरकारी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी टॅंकरची वेळेवर दुरुस्ती केली जात नसल्याने त्यात बिघाड होऊ लागला आहे. त्यामुळे टंचाईच्या कालावधीत खासगी टॅंकरचा आधार घेण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. त्यामुळे सरकारी टॅंकरची मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
रायगड जिल्ह्यातील धरणांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पुरेसा जलसाठा नसल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तालुका स्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, राजिप