चराचराला पावसाची ओढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चराचराला पावसाची ओढ
चराचराला पावसाची ओढ

चराचराला पावसाची ओढ

sakal_logo
By

अमित गवळे
पाली, ता. २१ (वार्ताहर) ः निसर्गातील विविध पक्षी, मासे, कीटक व प्राणी यांना पावसाच्या लवकर होणाऱ्या आगमनाची चाहूल लागली आहे. परिणामी बहुसंख्य पक्ष्यांची घरटी बांधून पूर्ण झाली आहेत. अनेक माशांच्या पोटात हंगामाआधीच अंडी सापडत आहेत. मुंग्यांनी आधीच रसद गोळा करून ठेवली आहे; तर वाळवीची घरांची (वारूळाची) दुरुस्ती पूर्ण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील काही निसर्ग अभ्यासकांनी या नोंदी नोंदविल्या आहेत. पावसापूर्वीची कामे लगबग आटोपून जणू काही हे पशू-पक्षी, कीटक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पाऊस आल्यानंतर वळगणीचे किंवा चढणीचे मासे सापडतात. त्यांच्या पोटात विकसित अंडी असतात. आता मिळालेल्या माशांमध्ये विकसित अंडी सापडली आहेत. जूनमध्ये पाऊस आल्यावर अंडी तयार झालेले मासे मिळतात, ते आताच १५ दिवस आधीपासून मिळू लागले आहेत. खाडीतून नदीत अंडी घालण्यासाठी येणारे राहू, कानोशी आदी मासे मे महिन्यातच नदीमध्ये आलेले रोहा येथील काही मच्छीमारांना आढळले आहेत.
उन्हाळ्यात हवा येण्यासाठी वारुळे उघडी असतात. या वारुळांना अनेक ठिकाणी छिद्रही असतात. पावसाळ्यापूर्वी वाळवी ही छिद्रे बुजविते, आतून आणखी एक आवरण चढविते व वारुळाची डागडुजी करते. सध्या या वाळवीने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आपल्या वारुळाची डागडुजी पूर्ण केली आहे व छिद्रे बुजविली आहेत. पाऊस लवकर येण्याची चाहूल लागल्याचे हे संकेत आहेत; तर मुंग्यांची खाणे साठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍याची माहिती कोलाड येथील वन्यजीव संरक्षक सागर दहिंबेकर यांनी दिली.
यंदा मे महिन्यातच अंडी असलेले विविध प्रकारचे मासे सापडत असल्‍याचे पेण येथील मासळी विक्रेत्या गौरी मनोरे यांनी सांगितले. विळे येथील पक्षी निरीक्षक व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी परिसर व जंगलात भटकंती करत असताना अनेक घटनांच्या नोंदी केल्या आहेत. पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांनी लवकरच घरटी बांधून पूर्ण केली आहेत. धिवर, कावळे, महाभृंगराज (rocket-tail-drongo) या पक्ष्यांनी अंडी उबविण्यास सुरुवात केली आहे. बहावा, ताम्हण, कवची/कौसी, पांगारा, पळस, सावर या झाडांना अगदी योग्य वेळेत फुलांचा बहर आला आहे. निसगचक्रातील हे संकेत यंदा पावसाच्या लवकर व मुसळधार होण्याचे असल्‍याचे अभ्‍यासक सांगतात.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35753 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..