
नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना दणका
अलिबाग, ता. २३ (बातमीदार) ः वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तीन हजार ५६२ चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करीत दणका दिला आहे. १४ ते २२ जूनपर्यंत केलेल्या कारवाईत २४ लाख २४ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उन्हाळी सुटीनिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र चालकांकडून अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत जिल्ह्यातील महामार्गासह जिल्हा, तालुका मार्गावर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. वाहन वेगात चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, जादा प्रवासी घेणे अशांवर १४ ते २२ मे या कालावधीत कारवाई करण्यात आली आहे. दररोज ३०० हून अधिक चालकांवर कारवाई होत असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांपर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना दणका बसला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35792 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..