
आंब्याच्या दरात कमालीची घसरण
अलिबाग : ढगाळ वातावरण आणि दोन दिवस पावसाचा झालेला शिडकाव, यामुळे आंब्याचे भाव कमालीचे घसरले आहेत. यंदा उशिराने आलेल्या आंबा पिकाचा भर सध्या जोमाने सुरू आहे. मात्र, पावसाची भीती आणि अचानक वाढलेली आवक यामुळे प्रति डझन १५० रुपयांपेक्षा कमी किमतीला आंबे विकावे लागत आहेत. सध्या रस्त्यांच्या कडेला आंबा विकणाऱ्या स्थानिक महिलांकडे पर्यटकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याने आंब्याचा हंगाम पुढील आठवडाभरापर्यंतच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्येही आता चढाओढ लागली आहे. पाऊस, वादळीवारा आणि ढगाळ वातावरणाने हापूस आंब्याचे दर पाडले आहेत.
व्यापारीही हे आंबे घेण्यास तयार नसल्याने किरकोळ बाजारात येथील बागायतदार आंबे विकण्याचा प्रयत्न करत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन येथे येणारे पर्यटक आंबे विकत घेत आहेत. यासाठी येथील महिला रस्त्याच्या कडेला आंबे विकताना दिसत आहेत. वाहतूक, दुकानांच्या भाड्याचा खर्च नसल्याने या महिलांना कमी किमतीत आंबे विकणे शक्य होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे. दोन महिन्यांपासून आंब्याचा नवा हंगाम सुरू झाला. सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील आंब्याची आवक कमी प्रमाणात होती. त्यामुळे देवगड, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, कणकवली तसेच रत्नागिरीतून रायगडमध्ये हापूस आंबा येत होता. आता येथील स्थानिक आंबा विकला जात नसल्याने बाहेरून येणाऱ्या आंब्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. आंबे खराब होऊ नयेत, यासाठी विक्रेत्यांची चढाओढ सुरू झाली आहे.
अलिबागच्या हापूसला मुंबईत गुजराती, मारवाडींकडून जास्त मागणी असते. मात्र, ही लोक पावसाळा सुरू झाल्यानंतर आंबे विकत घेत नाहीत. पर्यटकांची संख्याही पावसाळ्यात कमी होते. त्यामुळे हंगामातील शेवटच्या दिवसात जास्तीत जास्त माल विकण्याचा प्रयत्न आहे.
- सुलोचना पाटील, आंबाविक्रेती महिला
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35793 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..