
एकल महिलांना खुले होणार स्वयंरोजगाराचे साधन
अलिबाग, ता. २६ (बातमीदार) : कोरोना महामारीत निधन झालेल्या व्यावसायिकांच्या विधवा पत्नींना दिलासा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले आहे. या एकल महिलांना स्वयंरोजगाराचे साधन खुले व्हावे यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेत या महिलांच्या पतींच्या नावे असलेले दुकान व अन्य कागदपत्रे त्यांच्या नावावर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील एक हजार ४५० एकल महिलांना हक्काचे रोजगाराचे साधन मिळणार आहे.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.२५) घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, आमदार महेंद्र दळवी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट २०२० च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाले. कोरोनाच्या आजाराने अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना वेळेवर उपचार न झाल्याने, काहींचा रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने अशा अनेक कारणांमुळे रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील मृत झालेल्या व्यावसायिकांच्या एकल पत्नींना आर्थिक बळ मिळावे यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील एक हजार ४५० एकल महिलांना रोजगार सुरू करता यावा यासाठी मृत झालेल्या व्यावसायिक पतीच्या नावे असलेली दुकाने, व्यवसाय व अन्य कागदपत्रे एकल महिलांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
...
बाल विवाह रोखण्यासाठी पोलिसांची मदत
रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामध्ये काहींचे वडील, आई, तर काहींचे भाऊ, बहीण दगावले. अनेकांचा आधार गेला. त्यात एकल महिलांच्या मुली पोरक्या झाल्या. त्यामुळे काही लोकांकडून मुलींचे लवकर लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बालविवाह केले जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. याबाबत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेत बालविवाह रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांना निर्देश दिले आहेत. पोलिसांमधील बडी कॉप, पोलिस काका अशा अनेक योजनांमार्फत या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35826 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..