
तंबाखूजन्य पदार्थांचा रायगडला विळखा
अलिबाग, ता. ३० (बातमीदार) : गुटखा, गोवासारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सरसारखे आजार होतात. तरुणपिढी या पदार्थांच्या आहारी जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक करण्यावर बंदी आहे. तरीदेखील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागसह अनेक तालुक्यांत गुटखा, गोवासारखे तंबाखूजन्य पदार्थ खुलेआम विक्री होत आहेत. स्थानिक पोलिसांसह अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील काही भागांमध्ये किराणा दुकानांसह पान टपऱ्यांमध्ये या पदार्थांची विक्री राजरोसपणे सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असताना जिल्ह्यात औद्योगिकीकरणही वाढत आहे. पूर्वी तंबाखू हा पदार्थ टाईमपास म्हणून खाल्ला जात होता. हळूहळू नागरिकांच्या राहणीमानात बदल होऊ लागल्याने तंबाखूची जागा गोवा, विमल, गुटख्यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांनी घेतली. तंबाखूजन्य पदार्थ विक्री, वाहतूकीचे खरे धागेदोरे म्हसळा, पेण तालुक्यातून सुरू आहेत. दुकानदारांच्या मागणीनुसार, गोवा, गुटख्यांची विक्री आणि वाहतूक छुप्या पद्धतीने केली जाते. काही ठिकाणी टेम्पोमार्फत, तर काही ठिकाणी कारद्वारे दुकानदारांपर्यंत पोहचवले जाते. गोवा, विमल गुटखासारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक राजरोसपणे होत आहे.
पेण येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात या तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने आहेत. तर जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पान टपऱ्यांमध्ये गोवा, गुटखासारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. काही दुकानदारांना तर पोलिसांमार्फत कारवाई करण्याची धमकी देत फक्त गोवा व अन्य कंपनींचे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास भाग पाडले जात आहे. जिल्ह्यात कर्जतपासून खालापूर, पेण, रोहा, मुरूड, अलिबाग, म्हसळा या तालुक्यांत असे पदार्थ खुलेआम विक्री होत आहे. याकडे स्थानिक पोलिस मात्र दुर्लक्ष करत आहेत. या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्री, वाहतुकीमुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भीती निर्माण झाली आहे. यात आरोग्याचा प्रश्नही उद्भवत आहे. पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देऊन अशा तंबाखुजन्य पदार्थांवरील अनधिकृत विक्री व वाहतूकीवर अंकुश ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
-------------------
तंबाखुजन्य पदार्थांच्या आहारी जिल्ह्यातील तरुण पिढी जाऊ नये, यासाठी रायगड पोलिस दलामार्फत पथक तयार करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनाही याबाबत सूचना केल्या आहेत. काही ठिकाणी कारवाईही केली जात आहे. परंतु ज्या ठिकाणी विक्री, वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळेल, त्या ठिकाणी कारवाई केली जाईल.
- अशोक दुधे, पोलिस अधीक्षक, रायगड
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35899 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..