
रायगड जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा उसळी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील महिन्यात ५० च्या आसपास असणारी रुग्णसंख्या आता १२० इतकी झाली आहे. ही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईलगतचा जिल्हा असल्याने रायगड जिल्ह्यात मुंबईप्रमाणेच रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या रायगड जिल्ह्यात कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आलेले आहेत. मास्क लावणे हे ऐच्छिक आहे; मात्र मागील काही दिवसांपासून वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा मास्क लावणारे नागरिक दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने आपले आरोग्य सांभाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली आहे. ठाण्यामध्ये २७.९२ टक्के; तर रायगड जिल्ह्यात १८.५२ टक्के इतकी आहे. मुंबई लगतच्या पनवेल, उरण या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. त्याचबरोबर अलिबाग, मुरूड या तालुक्यातही ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. या तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
***
रायगड जिल्ह्यात ९९ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण झालेले आहे, तर दुसऱ्या डोसचे ९२ टक्के लसीकरण झालेले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कोरोनापासून फारसे घाबरून राहण्याची गरज नाही. त्यांनी कोरोनाला न घाबरता आपले दैनंदिन कामकाज करावे. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावण्याची सवय कायम ठेवावी.
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35904 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..