
बहुद्देशीय निवारा केंद्रे कागदावरच
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : रायगड जिल्हा प्रशासनाची बहुद्देशीय निवारा केंद्रे कित्येक वर्षे झाली तरी कागदावरच आहेत. तीन वर्षांपूर्वी कोकणातील ११ निवारा केंद्रांना मान्यता देण्यात आली. यात रायगड जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या दोन निवारा केंद्रांच्या कामाची निविदाही अद्याप मंजूर झालेली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर आता जिल्हा प्रशासनाला या निवारा केंद्रांची आठवण झाली असून या केंद्रांच्या मागणीसाठी पुन्हा पत्रव्यवहार सुरू करण्यात येत आहे.
कोकणात राष्ट्रीय चक्रीवादळ निवारण कार्यक्रमातून ११ बहुद्देशीय निवारा केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी आणि मुरूड तालुक्यातील बोर्ली येथे बहुद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांना मंजुरी दिल्यानंतर दोन चक्रीवादळे येऊन गेली, परंतु काम सुरू होऊ शकले नाही. अशी एकही आपत्ती नाही जिचा सामना रायगडमधील नागरिकांना करावा लागत नाही. त्यामुळे रायगडकरांना या निवारा केंद्रांची जास्त गरज भासत आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये चक्रीवादळ, पूर, दरडी कोसळणे, तर मानवी चुकीमुळे येणाऱ्या आपत्तींमध्ये गॅसगळती, कंपन्यांना आगी लागणे यांसारख्या आपत्ती रायगड जिल्ह्यात सातत्याने घडत असतात. अशा वेळी नागरिकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी आधार घ्यावा लागतो. मुसळधार पावसात नागरिकांचे खूपच हाल होत असतात. ज्या भागात आधार घेण्यासाठी सुरक्षित इमारती नाहीत, ज्या भागात आपत्तींची संख्या जास्त आहे, अशा भागातील नागरिकांना या निवारा केंद्रात आणून ठेवले जाणार आहे. वाहतुकीला सोपे आणि नैसर्गिक आपत्तीचा फारसा धोका नसणाऱ्या ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली होती. आपत्तीच्या वेळी निवारा म्हणून, तर अन्य वेळी लग्नकार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन उपक्रम राबवण्यासाठी ही बहुद्देशीय केंद्रे वापरली जाणार आहेत. अशा प्रकारच्या प्रत्येक निवारा केंद्रासाठी चार कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या मान्यतेचा शासन निर्णय २६ जून २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी मान्सूनचे आगमन होताच या बहुद्देशीय निवारा केंद्रांचा विषय चर्चेत येतो; मात्र अंमलबजावणी शून्य असल्याचे दिसून येत आहे.
...
विविध नैसर्गिक आपत्ती
१. रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा सागरी किनारा आहे. त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा किनारी भागाला फटका बसला तर त्यापासून बचाव करण्यासाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे.
२. जिल्ह्यात महाड, विळे-भागाड, धाटाव, पाताळगंगा, खोपोली येथे रासायनिक कारखान्यांच्या वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये वायुगळतीच्या घटना वारंवार घडत असतात. या वेळी खबरदारी म्हणून गावे खाली केली जातात. या वेळेला निवारा म्हणून या केंद्रांचा उपयोग होऊ शकतो.
३. दरवर्षी पूरपरिस्थितीची वेळ एकदा तरी येत असतेच. या वेळी पूरग्रस्तांच्या निवाऱ्याचा प्रश्न प्रशासनाच्या समोर असतो.
४. दरड कोसळल्यास पूर्ण सुविधा असलेल्या निवारा केंद्राची गरज भासते.
...
मंजूर झालेला आराखडा पाच वर्षांपूर्वीच्या किमतीनुसार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. हे बांधकाम करताना जागतिक बॅंकेने काही निकष ठेवलेली आहेत. त्यानुसार कार्यादेश मिळाल्यानंतर १८ महिन्यांत काम पूर्ण करावे लागणार आहे. बांधकाम चक्रीवादळरोधक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आतमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित वाटावे, असे असणे आवश्यक आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
...
बहुद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्राच्या कामात केंद्र शासनाचा वाटा ७५ टक्के असल्याने केंद्रातून अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. निवारा केंद्राचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी दिल्लीत पुढील काही दिवसांत बैठक बोलावण्यात येणार आहे.
- सुनील तटकरे, खासदार
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35954 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..