
बारा वर्षांच्या मुलीचे कॅन्सरग्रस्तांना केसदान
अलिबाग, ता. २ (बातमीदार) ः पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा उसर्ली खुर्द येथील सहावीत शिकणाऱ्या अनन्या अनिल पवार या १२ वर्षीय विद्यार्थिनीने कॅन्सर रुग्णांसाठी केस दान केले. यातून तिने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
अनन्याच्या या कामगिरीचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडून कौतुक करण्यात आले. बुधवारी (ता.१) तिचा सत्कार करण्यात आला. मोठे झाल्यावर समाजाची सेवा करण्यासाठी जिल्हाधिकारी बनण्याचे आपले स्वप्न असल्याचे अनन्याने या वेळी सांगितले.
केस दान करण्याची कल्पना तिला आत्तेबहिणीने दिली. त्यांनतर तिने केस दान करण्याची कल्पना आई, वडिलांना सांगितली. त्यांनीही आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी कॅन्सरग्रस्तांना मदत करणाऱ्या मुंबईच्या ‘मदत फाऊंडेशन’ या संस्थेशी संपर्क साधण्यात आला. मदत फाऊंडेशन गोरगरीब कॅन्सरग्रस्त बालकांना मोफत विग तयार करून देते. या संस्थेकडे अनन्या पवार हिने कापलेले केस दिले. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना मिळताच त्यांनी तिचा सत्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार बुधवारी डॉ. किरण पाटील यांच्या दालनात तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी अनन्या पवार हिच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
...
सत्काराला मान्यवरांची उपस्थिती
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अलिबाग येथील दालनात अनन्याचा सत्कार करण्यात आला. तेव्हा शिक्षण विभाग सहायक उपसंचालक शेषराव बडे, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव, उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे, जिल्हा समन्वयक संदीप वारगे, केंद्रप्रमुख निंबाजी गीते, मुख्याध्यापिका प्रगती म्हात्रे, वर्गशिक्षिका चित्ररेखा जाधव, पाणी व स्वच्छता विभाग संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील, अनन्या पवार हिची आई विद्या अनिल पवार यांच्यासह उसर्ली शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
...
चित्ररेखा जाधव यांचाही गौरव
रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत घेण्यात आलेल्या निर्मल गणेशोत्सव स्पर्धा २०२१ मध्ये परीक्षण व मूल्यांकन उसर्ली शाळेतील शिक्षिका चित्ररेखा जाधव यांनी केले होते. जिल्हा स्तरावर आयोजित स्वच्छ्ता उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले, याबद्दल चित्ररेखा जाधव यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
...
शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल
अनन्याच्या या उपक्रमाची दखल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेऊन त्यासंदर्भात ट्विट देखील केले आहे. शिवाय रायगड दौऱ्यावर आल्यानंतर अनन्याची भेट घेऊन तिचा सत्कार व कौतुक करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
...
कॅन्सरग्रस्तांसाठी मला माझे केस देता आले याबद्दल खूप छान वाटतेय. माझे केस मोठे झाल्यावर मी पुन्हा ते कॅन्सरग्रस्तांसाठी दान करणार आहे. शिवाय माझ्या काही मैत्रिणीदेखील त्यांचे केस दान करण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक लोक या चळवळीत जोडले जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- अनन्या पवार, केसदान करणारी चिमुकली
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35959 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..