चरीतील ऐतिहासिक स्थळांचा कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चरीतील ऐतिहासिक स्थळांचा कायापालट
चरीतील ऐतिहासिक स्थळांचा कायापालट

चरीतील ऐतिहासिक स्थळांचा कायापालट

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग ः
अलिबाग, ता. ११ ः सावकारी जाचाविरोधात २७ ऑक्‍टोबर १९३३ मध्ये ‘चरी’ या ठिकाणी शेतकऱ्‍‌यांनी पुकारलेल्‍या संपाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. तब्बल सात वर्षे हा संप सुरू राहिल्‍याने जगातील दीर्घकाळ चाललेला संप म्हणून चरीचा संप ओळखला जातो. ऐतिहासिक संपाचे केंद्रबिंदू असलेल्‍या ‘चरी’ या ठिकाणाचा लवकरच कायापालट होणार असून त्‍यासाठी सरकारकडून निधीही उपलब्‍ध झाला आहे.
शेतकऱ्यांचे नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन खोत व जमीनदारांच्या अन्यायाविरोधात संप पुकारला होता. संपामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही सहभाग होता. संपामुळेच कसेल त्याची जमीन हा कायदा मंजूर झाला. ऐतिहासिक संपाचे स्मरण म्हणून चरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ग्रंथालय, वाचनालय व सामाजिक सभागृह उभारले जाणार आहे. त्‍यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्‍वाची ठिकाणे व स्थळांचा विकास करण्यासाठी एक वेगळा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चरी संपामध्ये दिलेल्या योगदानाची, तसेच शेतकऱ्यांचे नेते नारायण पाटील यांनी घेतलेल्‍या धाडसी निर्णयाची आठवण तरुण पिढीला कायम राहावी, यासाठी ‘चरी’ येथील शेतकरी संपाच्या स्मारकाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

चरी या ठिकाणी स्मारक उभारण्यापासून सभागृह, वाचनालय, संग्रहालय बांधले जाणार आहे. या कामाच्या निविदाही काढण्यात आल्‍या आहेत. मात्र जागेअभावी प्रश्‍न प्रलंबित होता. आता सभागृहासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामांसाठी निधीची मान्यता समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडून घेतली जाणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यावर लवकरच कामांना सुरुवात केली जाईल.
- के. वाय बारदेस्कर, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम

चरी हे ऐतिहासिक स्थळ आहे. नारायण नागू पाटील यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी संपाची नोंद जगाच्या इतिहासात घेतली जात आहे. आमदार असताना या ठिकाणी स्मारक, ग्रंथालय, वाचनालय व्हावे, यासाठी निधी मंजूर करून घेतला होता; परंतु जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे लवकरच चरी येथे चांगले स्मारक होणार आहे.
- सुभाष ऊर्फ पंडित पाटील, माजी आमदार

चरीचा संप हा शेती कसणाऱ्या कुळांना धार्मिक, सामाजिक गुलामगिरीतून मुक्ती देणारा ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्यामुळेच आगरी-कोळी समाजाला वैभव प्राप्त झाले आहे. नारायण नागू पाटील, त्यांचे संपकरी शेतकरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान भावी पिढीसाठी नक्कीच आदर्श ठरणारे आहे. चरी येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासह, सामाजिक सभागृह, ग्रंथालय व वाचनालयामुळे या भागाला पर्यटनासह ऐतिहासिकदृष्ट्या अधिक महत्त्‍व प्राप्त होणार आहे.
- अॅड. राकेश पाटील, शेतकरी नेते

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36012 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top