एनडीआरएफचा महाडमध्ये तळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनडीआरएफचा महाडमध्ये तळ
एनडीआरएफचा महाडमध्ये तळ

एनडीआरएफचा महाडमध्ये तळ

sakal_logo
By

महेंद्र दुसार
अलिबाग, ता. १५ : रायगड जिल्ह्यात गतवर्षी पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना पूर्ण झाल्याचा दावा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण महाड, पोलादपूर तालुक्यात जास्त असल्याने पुणे येथून आपत्ती व्यवस्‍थापनाचे पथक दोन महिने महाडमध्ये तळ ठोकून बसणार आहे. त्यांच्याकडे आपत्तीबचाव कार्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा असणार आहे. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर ओढावणाऱ्या आपत्तीमध्ये हे पथक नागरिकांची मदत करणार आहे.
सावित्री नदीमुळे महाड, कुंडलिका नदीमुळे रोहा, अंबा नदीमुळे नागोठणे यासह उल्हास, पाताळगंगा, काळ नदीकिनारी वसलेल्या गावांना पुराची दाट शक्यता असते. या गावांमध्ये बचाव कार्याची साधने, संपर्क यंत्रणा, प्रशिक्षण देण्यात आले आहे. मान्सूनला सुरुवात झाल्याने पुराचा धोका असणाऱ्या गावांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांसह बचाव कार्यासाठी आवश्यक उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून मार्च महिन्यापासून राबवण्यास सुरुवात केली होती. त्या पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी जिल्ह्यात सहा बोटी देण्यात आल्या असून, पुराची पूर्वकल्पना देण्यासाठी महाड येथे दोन ठिकाणी (अलर्ट सिस्टिम) भोंगे लावण्यात आले आहेत. यासह हॅम रेडिओ, वॉकीटॉकी, सॅटेलाईट फोन (आय सॅट फोन) देण्यात आले आहेत. महापुरात बचावकार्य कसे राबवयाचे याचे जवळपास दीड हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून राबवलेल्या या उपाययोजना पूर्ण झाल्‍याचा दावा केला जात आहे.

तत्काळ संपर्कासाठी वॉकीटॉकीचे ५४ सेट
गतवर्षी संपर्क यंत्रणा निकामी ठरल्याने महाड आणि तळीये, साखरकोंड येथे मदत कार्य पोहचवण्यात प्रशासनाला अडचणी आल्या. तेथे काय परिस्थिती आहे, याची कल्पना येण्यास जिल्हा प्रशासनाला खूप वेळ लागला. यामुळे जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली होती. याचा बोध घेत तहसील कार्यालयाकडे ५४ वॉकीटॉकीचे सेट देण्यात आले आहेत.

२४ आय सॅट फोन देणार
संपर्क यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २४ सॅटेलाईटद्वारे चालणारे फोन मागविले आहेत. हे फोन पोलिसांकडे आहेत. कोणतीही आपत्ती आली तरी संपर्क यंत्रणा कुचकामी ठरू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रयत्‍नशील आहे.

सहा बोटीचे वाटप
महाड पालिका - १
महाड पोलिस - १
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची संस्था (गुरुनाथ साठेलकर) खोपोली- १
वाइन्डर वेस्ट अॅण्ड अॅडव्हेंचर, (महेश सानप) कोलाड- १
प्रशांत साळुंखे रेस्क्यू टीम- २

पूर परिस्थितीत बचावकार्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री संबंधित पालिका प्रशासन, ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. यामध्ये बोटी, लाईफ जॅकेटचा समावेश आहे. यासह स्थलांतर करण्यात येणाऱ्‍‌या व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्‍था सामाजिक संस्थांकडून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील यंत्रणा राबवण्यासाठी शीघ्र प्रतिसाद गट तयार करण्यात आले आहेत. येणारा धोका ओळखून त्याद्वारे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न आहेत.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36153 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top