
जिल्ह्यात अकरा तालुक्यांमध्ये दुष्काळ
प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ ः जून महिना संपत आला तरी पावसाने अद्याप जोर न धरल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जवळपास अकरा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने पाण्यासाठी नागरिकांना विशेषकरून महिलांना वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यात तीनशेहून अधिक ठिकाणी ३७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. काही भागांमध्ये रिमझीम पाऊस पडत आहे, अद्याप मुसळधार पावसाला सुरुवात न झाल्याने शहरांसह ग्रामीण भागात पाणीसमस्या गंभीर झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, पेण, पनवेल, रोहा, खालापूर, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, सुधागड, कर्जत या अकरा तालुक्यांतील ३०३ ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. धरणांची पातळी खालावल्याने अनेक भागांत गाळ-माती मिश्रित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांवर पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली असून आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील २४५ वाड्या, ५८ गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने उपविभागीय स्तरावर टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३०३ ठिकाणी ३७ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पेण तालुक्यात १३ टॅंकर, महाड तालुक्यात ९ टॅंकर, त्यानंतर अन्य नऊ तालुक्यांत दोन किंवा एक टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी मागणीनुसार टॅंकरची सुविधा करण्यात आली आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा
पाणीटंचाईवर दृष्टिक्षेप
तालुके - गावे - वाड्या - टॅंकर
अलिबाग - ०४ - ०० - ०२
उरण - ० - ०५ - ०२
पनवेल - ०२ - ०४ - ०२
कर्जत - ०४ - १२ - ०२
खालापूर - ०६ - ०४ - ०२
पेण - २० - ११० - १३
सुधागड - ०० - ०३ - ०१
माणगाव - ०३ - ०६ - ०२
महाड - १३ - ८० - ०९
पोलादपूर - ०५ - १८ - ०१
श्रीवर्धन - ०१ - ०३ - ०१
-----------------
५८- २४५- ३७
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36186 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..