
माणगावमध्ये आदिवासीवाडीवर सापडले आठ बॉम्ब
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : माणगाव तालुक्यातील पाणसई येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आठ जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. पहाटे ४.३० च्या दरम्यान करंजवाडी आदिवासी वाडीवर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने ही कारवाई केली. दोन तास चाललेल्या या कारवाईत बॉम्बशोधक पथकाला हे जिवंत बॉम्ब सापडले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ब्रुनो नावाच्या श्वानाने महत्त्वाची कामगिरी बजावली.
करंजवाडी आदिवासीवाडीवर गावठी बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीपासूनच या भागात पोलिसांनी सापळा लावला. त्यानंतर पहाटे ४.३० वाजता पोलिसांनी धाड टाकून आठ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत केले. हे सर्व बॉम्ब माणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या मुद्देमालामधील स्फोटक पदार्थांचा प्रकार, त्याची स्फोटकता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. सध्या या घटनेत ताब्यात घेतलेल्या दोन व्यक्तींचा जबाब लिहून घेतला जात आहे. हे बॉम्ब शिकारीसाठी आणले होते, असा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणात सबंधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, सहायक पोलिस निरीक्षक जे. जे. भोईर, हेड कॉन्स्टेबल भूपेंद्र देसाई, संतोष राऊत, राहुल पाटील, शैलेश गोतावडे, जितेंद्र सातोडे यांनी या कारवाईत भाग घेतला. डुक्कर किंवा तत्सम जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी हे बॉम्ब तयार करण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती हाती लागली आहे. हे आदिवासी स्वतःच असे बॉम्ब तयार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36247 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..