जीएसटी संकलनात अनियमितेचा संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटी संकलनात अनियमितेचा संशय
जीएसटी संकलनात अनियमितेचा संशय

जीएसटी संकलनात अनियमितेचा संशय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. २१ : रायगड जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटदारांकडून वसूल करण्यात आलेल्या जीएसटी संकलन व जीएसटी परतावा यामध्ये कोट्यवधींची अनियमितता असल्याचा संशय व्यक्त होत आहे. काही कंत्राटदार राजकीय वरदहस्ताचा वापर करून जीएसटीची रक्कम एका बोगस खात्यात जमा करून परस्पर काढून घेत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी सर्व विभागांकडे जीएसटी संकलनाची माहिती मागविल्‍याने अधिकारी व  ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी जमा होणाऱ्या जीएसटीसंदर्भात जिल्हा परिषदेकडे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली होती. परंतु जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला ही माहिती देता आली नाही. यामुळे गेल्‍या पाच वर्षांच्या कालावधीत खर्ची पडलेल्या बिलांमधून वसूल करण्यात आलेल्या एकूण जीएसटी कराची माहिती, वसूल जीएसटीची रक्कम ज्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली, त्या खात्यांचा तपशील, भरणा केलेल्‍या रक्कमांचे व्हाउचर्स तसेच कंत्राटदारांना जीएसटी परतावा दिला असल्यास तो कोणत्या खात्यामध्ये जमा करण्यात आला, त्याची तपशीलवार माहिती संकलित करून देण्याचे निर्देश रायगड जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने सर्व विभागांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम विभागामध्ये विकासकामांची कोट्यवधींची बिले अदा केली जातात. जिल्हा परिषदेच्या कंत्राटदारांकडून जीएसटी वसूल करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. परंतु काही ठेकेदार राजकीय प्रभावाचे अस्त्र वापरून जीएसटीची कोट्यवधींची रक्कम एका बोगस खात्यात भरणा करून जीएसटी भरल्‍याचे दाखवतात व तीच रक्‍कम परस्पर काढून घेतात, असा दावा सावंत यांनी केला आहे.

जीएसटीची चोरी हा मोठा गुन्हा आहे, असे असतानाही जिल्हा परिषद राजकीय वरदहस्त लाभलेल्या कंत्राटदारांकडे दुर्लक्ष करीत आहे. माहिती प्राप्त झाल्यावर त्यामध्ये अनियमितता आढळल्यास राज्यकर आयुक्त, महाराष्‍ट्र राज्य यांच्याकडे अपील करून रायगड जिल्हा परिषदेमधील जीएसटी संकलनाची तपासणी करण्याची मागणी करण्यात येईल.
- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते

बांधकाम विभागाची कामे जास्त असतात, त्यामुळे या विभागासाठी काम करणाऱ्या कंत्राटदारांची संख्या जास्त आहे. अर्जामधील मागणी केलेली माहिती संकलित करून देण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
- के. बारदेसकर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्‍हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36270 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top