पालीत वाहतुकीवर प्रचंड ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीत वाहतुकीवर प्रचंड ताण
पालीत वाहतुकीवर प्रचंड ताण

पालीत वाहतुकीवर प्रचंड ताण

sakal_logo
By

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २२ : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीची समस्या जटील झाली आहे. अरुंद रस्ते, नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक, अवजड आणि डम्‍पर वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी सोडवणे अवघड झाले आहे. याशिवाय, १०-१२ वर्षांपासून बाह्यवळण मार्ग अडचणीत अडकल्याने वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना होऊ शकलेली नाही.
पालीत डम्‍पर, ट्रॅक्टर व लक्झरी वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. त्‍यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटकांच्या वाहनांना मार्ग मिळत नाही. त्यात अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दिवस-रात्र कोंडी होत असल्याने नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. अनेक नागरिक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. त्यात येथील रस्ते अरुंद आहेत. अशा अरुंद रस्त्याच्या दुतर्फा अनेक जण दुचाकी व चारचाकी उभी करून खरेदी किंवा इतर कामासाठी जातात. यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याने अन्य वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांची येथून वाट काढताना मोठी गैरसोय होते.
अनेक दुकाने, टपऱ्या व इमारती रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. काही ठिकाणी तर अनधिकृत बांधकामेही आहेत. बांधकामाचे साहित्यही रस्त्यावर पडलेले असते. यामुळे येथून मार्ग काढणे वाहनचालकांना शक्य होत नाही. शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत वाहतुकीवर प्रचंड ताण येत असल्याने अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध नाक्यांवर पोलिस तैनात असतात; मात्र या कारणांमुळे कोंडी सोडवणे अवघड होते. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


कोंडीची ठिकाणे
बल्लाळेश्वर मंदिर ते ग. बा. वडेर हायस्कूल, मारुती मंदिर चौक ते जुने एस.टी. स्टॅण्‍ड, गांधी चौक ते बाजारपेठ, कुंभार आळी, बँक ऑफ इंडिया, हटाळेश्वर चौक ते मिनीडोअर स्टॅण्ड‍, बस स्थानक ते गांधी चौक, एसबीआय बँक ते गांधी चौक अशा विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.

इतर वाहनांची वर्दळ
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाववरून किंवा वाकणवरून पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरून विळेमार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी, पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते.

बाह्यवळण मार्ग ठरेल वरदान
राज्य सरकारने २०१० मध्ये पाली बाह्यवळण मार्गाला मान्यता दिली आहे. रस्त्यास १८ कोटी, तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती. हा मार्ग वाकण-पाली मार्गावरील बलाप येथून पाली पाटणूस राज्यमार्ग ९४ ला जोडला आहे. मात्र, या मार्गात पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेकडो शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यांचा या मार्गाला विरोध आहे. परिणामी, विविध कारणांमुळे मार्गाचे काम रखडले आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास अन्य वाहने पालीच्या बाहेरूनच निघून जातील. त्यामुळे वाहतूक कोंडी आटोक्यात येईल.

----
डम्‍पर व अवजड वाहनांमुळे अधिक कोंडी होते. अपघाताचा धोकाही कायम असतो. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करावी. याशिवाय, वाहनचालकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होईल. पालीत नो-इन्ट्री, नो पार्किंगचे फलक लावलेले आहेत. नागरिकांनी वाहने मोकळ्या जागेत उभी केल्यास शहरात वाहतूक कोंडी होणार नाही.
- आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत पाली

अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी आणि शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी अवजड वाहनांमुळे कोंडी होणार नाही. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अवजड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाईल.
- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36297 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top