
रायगडमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. २६ जून रोजी ३०३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण एक हजार ३८४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्ण संख्या वाढू लागताच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सद्यस्थितीत २३ गंभीर रुग्ण रुग्णालयात असून यातील १८ रुग्ण सामान्य कक्षात, ४ रुग्ण ऑक्सिजन बेडवर, तर एक रुग्ण अतिदक्षता कक्षात दाखल आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क व सजग राहण्याचे, तसेच स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. याशिवाय लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36359 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..