
उत्पादन वाढीसाठी यंदा आधुनिक पध्दतीने भातलागवड
अलिबाग, ता. २९ (बातमीदार) ः पारंपरिक पद्धतीने वारंवार भात लागवड केल्यास उत्पादनात घट होऊ लागते. रायगड जिल्ह्यातील भात शेतीचे उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी कृषी विभागाने सुधारित भात लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात चारसूत्री, (एसआरटी) सगुणा राईस टेक्नोलॉजी, ड्रम सिडर आणि यंत्र या आधुनिक पद्धतीने भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक हजार हेक्टर क्षेत्रामध्ये ही लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांबरोबरच मार्गदर्शन केले जाणार आहे.
एकेकाळी रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. खर्च अधिक आणि तुलनेने कमी उत्पादन होत असल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली. जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्र वाढावे आणि अधिकाधिक तरुणांनी शेतीची कास धरावी, वेगवेगळे प्रयोग करावेत, यासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकाच्या मदतीने चार सुत्री पद्धतीचे प्रात्यक्षिकद्वारे शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये भात पिकांचा अवशेषांचा फेर वापर, गिरीपुष्पाचा वापर, नियंत्रित लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर अशी चतुःसुत्री पद्धत असणार आहे. जवळपास ७५० हेक्टर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. तसेच सगुणा राईस टेक्नोलॉजी पद्धतीने १०० हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड केली जाणार आहे.
ड्रम सिडर पद्धतीने १०० हेक्टर क्षेत्रात, तर यंत्राद्वारे ५० हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड केली जाणार आहे. यातील यंत्राद्वारे होणारी लागवड रोहा व खालापूर तालुक्यामध्ये करण्याचे नियोजन केले आहे; तर अन्य सुधारित भात लागवड सर्वच तालुक्यांत करण्याचा प्रयत्न आहे. चार सुत्री भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना भात बियाणे अनुदान पद्धतीने दिली जाणार आहेत. तसेच युरिया ब्रिकेट गोळ्याचे पॅकेट अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत. बीज प्रक्रिया व औषधे वापरण्याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांना होणार फायदा
सुधारित भात लागवडीमुळे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यात तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भात शेती निश्चितपणे फायदेशीर करणारे असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
पारंपरिक पद्धतीने भात लागवड करण्याऐवजी शेतकऱ्यांनी चार सुत्री पद्धत वापरून अधिक उत्पादन घेणे आवश्यक आहे. शेतात प्रात्यक्षिकद्वारे लागवड कार्यक्रम प्रत्येक कृषी सहाय्यकांच्या मदतीने गावांमध्ये सुरू आहे. सुधारित भात लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न असून शेतकऱ्यांना याचे मार्गदर्शन वेगवेगळ्या माध्यमातून केले जात आहे. जेणेकरून भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
- दत्तात्रय काळभोर, कृषी उपसंचालक
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36404 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..