नांगरणीसाठी बैलांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांगरणीसाठी बैलांची मागणी
नांगरणीसाठी बैलांची मागणी

नांगरणीसाठी बैलांची मागणी

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
पावसाळा सुरू झाल्याने सध्या बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. यांत्रिकीकरणाच्या युगातही जिल्ह्यातील अनेक शेतकरी नांगरणीसाठी बैलांचा शोध घेत आहेत. जमिनीत खोलवर जाणारा नांगराचा फाळ, छोट्या व तुकड्यांच्या शेतासाठी यंत्राद्वारे नांगरणीपेक्षा पारंपरिक नांगरणीला प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात यंदा ९५ हजार हेक्टरवर भातशेती केली जात आहे.
पावसाने हजेरी लावताच पेरणीसाठी जमीन नांगरणीला सुरुवात झाली आहे. आता भात रोपे तरारली असून लावणीची लगबग सुरू आहे. जिल्ह्यातील भात शेती ही तुकड्यांमध्ये विभागली आहे. डोंगर उतारावर, दुर्गम भागात शेती असल्‍याने, तसेच शेताभोवती असलेले बांध यामुळे तेथे ट्रॅक्टर नेणे व नांगरणी करण्यात अडचणी येतात. मात्र पारंपरिक नांगर व बैलांना कुठेही सहज नेता येते.
बैल नांगराचा फाळ जमिनीत खोलवर जाऊन जमीन अधिक भुसभुशीत करतो. त्यामुळे पेरणी करणे सोपे जाते. शेतात नांगरणीसाठी बैल झुंपण्याला अनेक जण शुभ मानतात. तसेच बैलांच्या पायामुळे तण व गवत मरतात. त्‍यामुळे काही शेतकरी पेरणी व लावणीच्या दरम्यान बैलांच्या माध्यमातून नांगरणीलाच पसंती देत आहेत.
नांगऱ्याला मागणी अधिक
नांगरणी करणाऱ्या शेतकरी किंवा मजुरांना नांगऱ्या म्हणतात. काही शेतकरी स्वतः नांगरणी करतात, तर काही जण नांगऱ्याला बोलावतात. एक बैलजोडी व नांगरासह नांगऱ्याची मजुरी ७०० ते १००० रुपये प्रतिदिवस आहे. जर पैसे कमी असतील तर नांगऱ्याच्‍या मदतीसाठी तीन-चार माणसे द्यावी लागतात. नांगऱ्याला मजुरीबरोबरच एक वेळची न्याहरी, जेवण व दोन वेळेचा चहापाणी द्यावे लागते. सध्‍या अशा नांगऱ्यांची खूप मागणी आहे.

कोट
दरवर्षी शेतीसाठी बैलांच्या नांगरालाच पसंती देतो. ट्रॅक्टरपेक्षा पारंपरिक पद्धतीने नांगरणी चांगली होते. बैलाच्या पायामुळे गवत व तण मरतात. मात्र असे नांगर हल्ली फारसे मिळत नाहीत. मजुरीही वाढली आहे.
- शरद गोळे, शेतकरी, सुधागड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36444 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top