
कीटकांची अनोखी दुनिया
अमित गवळे, पाली
पावसाची सुरुवात मृग नक्षत्राने होते. ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेती कामाची सुरुवात. या नक्षत्रातच लाल भडक रंगाचे, मखमली वेलवेटच्या कापडासारखे दिसणारे मृगाचे कीटक शेत, माळरान व जंगलात दिसून येतात. मात्र, जिल्ह्यात यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाली. यामुळे हे कीटक उशिराने जमिनीवर दाखल झाले आहेत. जिल्ह्यात माणगाव येथील पाटणूस, विळे, श्रीवर्धन, सुधागड, रोहा आदींसह इतर अनेक ठिकाणी दिसू लागल्याने निसर्ग अभ्यासक व पर्यावरणप्रेमी सुखावले आहेत.
----
लाल भडक रंगाच्या कीटकाला मृग कीटक किंवा मृग नक्षत्राचा किडा असे म्हणतात. या कीटकाच्या दिसण्यावरून आणि निसर्गाने केलेल्या त्याच्या अप्रतिम रचनेमुळे याला विविध नावे ठेवण्यात आली आहेत. संस्कृतमध्ये या कीटकाला वीर बाहुती, तेलगूत अरुद्रा, उर्दूत राणी किडा, तर मराठीत काही ठिकाणी याला गोसावी किडाही म्हटले जाते. तर इंग्रजीचे ''रेड वेलवेट माईट'' असे म्हणतात. या किड्याचे शास्त्रीय नाव ''ट्रॉम्बेडियम ग्रेंडीसिमम'' असे आहे. पाटणूस येथील निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले की, पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे हे कीटक जमिनीवर येतात. पूर्ण वाढ झालेला हा कीटक साधारणतः चार मिलिमीटर लांबीचा असतो. नर कीटक हे मादी किटकांपेक्षा आकाराने लहान असतात. पावसाळा सुरू झाल्यावर साधारण २०-२५ दिवसांनंतर पावसाचा जोर वाढू लागला की, हे कीटक स्वतःला पुन्हा जमिनीत गाडून घेतात आणि लुप्त होतात. मृगाच्या पावसात मादीला आकर्षित करण्यासाठी हे कीटक जमिनीवर येतात. मादी ओल्या मातीत अंडी देते. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यातून पिल्ले बाहेर येतात.
हे कीटक दिसू लागले की ग्रामीण भागातील नागरिक यांची पूजा करून शेतीची मशागत करून पेरणी करण्यास सुरुवात करतात. यंदा उशिरा व कमी प्रमाणात हे कीटक दिसत आहेत. सद्यस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचबरोबर अनियमित पावसामुळे भातलावणीलाही उशीर होत आहे. निसर्गाचा होणारा ऱ्हास कमी केला, तर भविष्यामध्ये निसर्ग भरभरून देणार, हे मात्र निश्चित आहे.
शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे; तसेच काही ठिकाणी या कीटकांना मलेरिया पॅरलिसीस या रोगांवर उपाय म्हणून पकडले जाते. या कीटकांना मारून औषधाप्रमाणे त्याचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे. याचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज आहे.
- राम मुंढे, पर्यावरण अभ्यासक, विळे, माणगाव
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36445 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..