
हेरीटेज वृक्षांना संरक्षण
महेंद्र दुसार, अलिबाग
दोन वर्षे लागोपाठ आलेल्या चक्रीवादळांमध्ये दुर्मिळ जातीची अनेक जुनी झाडे उन्मळून पडली; तर काही अद्याप तग धरून आहेत. मंदिर, तलाव परिसरातील जुन्या झाडांना ‘हेरिटेज वृक्ष’ म्हणून दर्जा देत जतन केले जाणार आहे. या वृक्षांच्या सान्निध्यात विविध पक्षांची घरटी असल्याने त्यांनाही संरक्षण मिळणार आहे. यासाठी वृक्षांच्या भोवताली चौथरे बांधणे, त्यांची डागडुजीही केली जाणार आहे.
कोरोना कालावधीत रखडलेला वृक्षलागवड कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेने जोमाने पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला असून मोहिमेंतर्गत भारतीय प्रजातींची विविध झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच बांबूची बेटे निर्माण करण्याचे विशेष नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी अलिबागमधील कुंटे बाग व वरसोली समुद्रकिनारी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम महिनाभर राबविण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीत ८०० झाडे असे एकूण ६ लाख ४१ हजार ६०० झाडे जिल्ह्यात लावण्याचे नियोजन केले आहे.
निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात विदेशी जातीच्या वृक्षांना तग धरता आले नाही. ही झाडे वादळात समूळ नष्ट झाली. त्यामुळे स्थानिक जातीची झाडे लावण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. वृक्षलागवड मोहीम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे, समुद्रकिनाऱ्यावर खुल्या जागेत, दरडप्रवण क्षेत्रातील डोंगरपायथ्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी, पूरक्षेत्रात नदी किनाऱ्यालगतच्या ठिकाणी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे.
रोपांच्या संगोपनासाठी सूचना
जिल्हा परिषदेच्या अखात्यारीतील इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक रोप व प्रत्येक शिक्षकाने किमान दोन रोपे आणि सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना किमान दोन रोपे दत्तक घेऊन वृक्षारोपण करण्याचा संकल्प आहे. त्याचप्रमाणे लावलेली रोपे कायमस्वरूपी जगविण्यासाठी त्यांच्या सभोवती संरक्षक जाळी, बांबू किंवा लाकडाचे कुंपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वृक्षलागवड कार्यक्रम सर्वव्यापी करण्यासाठी तालुका, ग्रामपंचायतस्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभागात सवावेश असेल. त्यांना वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्यात येणार आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36450 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..