
नेणवली शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा
पाली, ता. ४ (वार्ताहर) : कृषी दिनाचे औचित्य साधून नेणवली शाळेत अनोखा पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वृक्षदिंडी काढण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांनी याआधी लावलेल्या झाडांचा वाढदिवस गाणी गात, फेर धरून केक व चॉकलेट वाटून साजरा केला.
गटशिक्षणाधिकारी एस. एल. बांगारे व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायत नेणवलीमार्फत झाडे उपलब्ध करून देण्यात आली. सर्वप्रथम सर्वांनी ग्रामपंचायत येथून वृक्षदिंडी काढली. ''झाडे लावा, झाडे जगवा'' अशी घोषणा करत विद्यार्थ्यांनी ''एक विद्यार्थी एक झाड'' उपक्रमांतर्गत काही झाडे आणली. त्यानंतर वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक संतोष हरपाल, उपशिक्षक राजेंद्र अंबिके व गणपत वरगडे, स्वयंपाकी ताई, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आधी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा केला. त्या झाडांना फेर धरून वाढदिवस गीत गाण्यात आले. तसेच, चॉकलेट वाटून अनोखा वाढदिवस साजरा केला.
झाडे लावण्यासोबतच आम्ही आधी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करताना मज्जा आली. चॉकलेट आणि केक सुद्धा वाटला.
- श्रेयस कोंडे, विद्यार्थी नेणवली
कोविडनंतर दोन वर्षांनी मुलांसोबत वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम झाला. या वेळी खूपच आल्हाददायक वाटले.
- गणपत वरगडे, उपशिक्षक, नेणवली
पाली : नेणवली शाळेत वृक्षारोपण करताना शिक्षक, विद्यार्थी.
पाली : नेणवली शाळेत झाडाला फेर धरून झाडांचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थी.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36468 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..