
कर्जत स्थानकावर ३१ जुलैपर्यंत कोच इंडिकेटर्स
कर्जत, ता. ५ (बातमीदार) : कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती दर्शवणारे फलक बसवण्यात यावेत, यासाठी दोन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांचा रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर फलाट क्रमांक एकवर डब्यांची स्थिती दर्शवणारे फलक बसविण्यात आले; परंतु फलाट दोन व तीनवरील फलक प्रलंबित होते. या फलकांची ३१ जुलैपर्यंत सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
कर्जत स्थानकात आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आरक्षित डबा शोधण्याच्या नादात गाडी चुकायची, तर कधी सामान फलाटावरच राहायचे. अनेकदा अपघातही झाले आहेत. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शवणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसवण्यात यावेत. यासाठी दोन वर्षांपासून ओसवाल रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. त्यानुसार फलाट क्रमांक एकवर डिजिटल कोच दर्शवणारे इंडिकेटर्स बसवले आहेत. तर फलाट दोन व तीनवर इंडिकेटर्स बसवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने १५ जूनपर्यंत इंडिकेटर्स बसवण्यात येईल, असे लेखी कळविले होते; परंतु जून महिना संपत आला तर इंडिकेटर्स बसवले नसल्याने ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाशी पुन्हा संपर्क साधला. त्या वेळी हे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36507 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..