
डिझेल प्रश्नाचा प्रवाशांना ताप
अलिबाग, ता. १० (बातमीदार) ः इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळ पर्याय म्हणून खासगी पेट्रोल पंपाचा आधार घेत आहे. चार महिन्यांपासून यावर तोडगा न निघाल्याने, चालक वाहकांसह प्रवाशांना नाहक फटका बसतो आहे. प्रवासादरम्यान बस खासगी पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबत असल्याने प्रवाशांचा वेळ नाहक खर्च होतो.
जिल्ह्यातील एसटीचा दिवसाला एक लाखांपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास होतो. त्यासाठी एसटीला दिवसाला सुमारे १५ हजार लिटर डिझेलची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, मुरूड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड या आगारांमध्ये डिझेल पंप असून इंडियन ऑइल कंपनीमार्फत डिझेलचा पुरवठा केला जातो. परंतु मार्चपासून कंपनी एसटी महामंडळाला खासगी पेट्रोल पंपापेक्षा २० ते ३० रुपये अधिक किमतीने डिझेल देत असल्याने एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे आहे.
डिझेलच्या वाढत्या दरामुळे एसटी महामंडळाने पर्याय म्हणून खासगी पंपाचा आधार घेतला आहे. याबाबत खासगी डिझेल पंपांशी करार करण्यात आला आहे. मार्च महिन्यांपासून खासगी पेट्रोल पंपाद्वारे एसटीमध्ये डिझेल भरले जात आहे. अनेकदा प्रवासादरम्यान खासगी पेट्रोल पंपावर इंधन भरण्याची वेळ एसटीवर येत आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागत असून वेळही खर्च होत आहे. चार महिने झाले तरी एसटी महामंडळ व इंडियन ऑइल कंपनीमध्ये अद्याप तोडगा न निघाल्याने प्रवाशांचा वेळ नाहक खर्ची पडत आहे.
एसटीला गळती, प्रवासी हैराण
लॉकडाऊनमुळे दोन वर्ष एसटी रस्त्यावर धावली नाही. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने पूर्ण क्षमतेने एसटी सुरू झाली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहे. त्यामुळे एसटीमधील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पावसाळ्यात अनेक एसटीतून गळती सुरू होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. तर काही प्रवासी छत्री घेउन बसतात. कधी खिडकीतून कधी छतावरून पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. अलिबाग एसटी बस आगारातील सुमारे दहा एसटीला गळती लागल्याचे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाचे डिझेल पंप असतानाही डिझेल भरण्यासाठी एसटीला खासगी पंपात जावे लागणे, ही गंभीर समस्या आहे. एसटीतील प्रवाशांची गैरसोय होऊ नये. यासाठी परिवहन विभागातील सचिवांशी चर्चा करून लवकरच मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- आमदार महेंद्र दळवी, अलिबाग
पावसाळ्यात एसटी बसला गळती लागू नये यासाठी यापूर्वीच आगार व्यवस्थापकांना सूचना केल्या होत्या. तरीदेखील एसटी गळत असल्यास गळती थांबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. प्रवाशांना सुखकर व आरामदायी प्रवास करता यावा याकडे लक्ष दिले जाईल.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36574 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..