
बचतगटांना रोजगार
अलिबाग, ता. १६ (बातमीदार) ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर झेंडा’ अभियान सर्वत्र राबविले जाणार आहे. रायगड जिल्ह्यात तिरंगा तयार करण्यापासून विक्री करण्याची जबाबदारी बचत गटांकडे देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेकडो बचत गटांतील हजारो महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात जवळपास १६ हजार बचत गट असून एक लाखांपेक्षा अधिक महिला बचत गटांमध्ये काम करतात. त्यातील काही महिला शिवणकाम करतात. बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ, वस्तू, रेडिमेड कपडे तयार करून स्टॉल लावून विक्री करतात. यातून त्यांना रोजगार मिळतो.
बचत गटांना आर्थिक उभारी देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. हर घर झेंडा अभियानाच्या माध्यमातून शिवणकाम क्षेत्रात कार्यरत बचत गटांतील महिलांकडून झेंडे तयार करून घेतले जाणार आहेत. ते झेंडे विक्रीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात विक्री स्टॉल व ठिकठिकाणी बचतगट महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार तालुका, ग्रामपंचायत स्तरावर महिला बचत गटांच्या बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. बचत गटांना झेंडे तयार करण्याचे आवाहन जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील प्रशासनाकडून करण्यात आले असून ८५२ बचत गटांमधील शिवणकाम करणाऱ्या एक हजार १५० महिला झेंडे तयार करण्यासाठी सरसावल्या आहेत.
जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार, बचत गटांना झेंडे तयार करण्यासाठी आवाहन केले असून गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेतल्या आहेत. शिवणकाम करणाऱ्या १ हजार १५० महिलांनी झेंडे तयार करण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे. यातून त्यांना रोजगार मिळेल आणि आर्थिक उन्नती साधण्यास मदत होईल.
- सिद्धेश राऊळ, जिल्हा व्यवस्थापक, उमेद-ग्रामीण जीवनोन्नती अभियान, रायगड
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36609 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..