तळीये-शिंदेवाडीतील ग्रामस्‍थांचा स्थलांतरास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळीये-शिंदेवाडीतील ग्रामस्‍थांचा स्थलांतरास नकार
तळीये-शिंदेवाडीतील ग्रामस्‍थांचा स्थलांतरास नकार

तळीये-शिंदेवाडीतील ग्रामस्‍थांचा स्थलांतरास नकार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११: गतवर्षीच्या तळीये दरड घटनेचा बोध घेऊन जिल्हा प्रशासन जीवितहानीसंदर्भात कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाही. दरडीचा सर्वाधिक धोका महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील गावांना सतावत असल्याने जिल्हा प्रशासनाने रेड अलर्टमध्ये या तालुक्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. दरडग्रस्त २३ गावांमधील दीड हजारांहून नागरिकांचे आतापर्यंत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. मात्र, तळीये - शिंदेवाडीतील २७ कुटुंब अद्यापही वाडीमध्येच ठाण मांडून आहेत. महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी या ११७ ग्रामस्थांची मनधरणी करीत असतानाही त्यांना यश आलेले नाही.
५२ कुटुंबाची शिंदेवाडी दरडग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तळीये या महसुली गावाची ही वाडी आहे. याच तळीये गावात गतवर्षी दरडीखाली ८७ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे यंदा प्रशासनाकडून अतिवृष्टीच्या कालावधीत गावाचे सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ग्रामस्थ स्‍थलांतरास तयार नाहीत. रविवारी (ता.१०) महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्यासह मंडळ अधिकारी किशोर पाटील, तलाठी गोरोबा तिडकरी, गावाचे कोतवाल दगडू कोंडाळकर यांनी रात्री गाव-बैठक घेऊन ग्रामस्थांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ग्रामस्थ गावातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. अखेर, ज्या वेळी अतिवृष्टी होत असेल तेव्हा तरी घरे बंद करून बाजूच्या बारसगाव, भावे, बिरवाडी येथील नातेवाइकांच्या घरी आश्रयास जावे, अशी मनधरणी करण्यात आली. ५२ कुटुंबाची ही वाडी डोंगराच्या पायथ्याशीच असल्‍याने दरड कोसळण्याची भीती सतत असते. त्यामुळे येथील १९ कुटुंबीयांनी कायमचे मुंबई, पुणे येथे स्थलांतर केले आहे, तर ६ कुटुंबांनी जवळच्या गावातील नातेवाइकांकडे आश्रय घेतला आहे.

दरडीची भीती कायम असली तरी नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर तत्काळ होणे शक्य नाही. यासाठीचे काम सुरू आहे. सध्या अतिवृष्टीमुळे कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक दिवस हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ग्रामस्थांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.
- सुरेश काशीद, महाड तहसीलदार

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36612 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top