
कर्जतमध्ये भातशेती संकटात
कर्जत, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे राब पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे. परंतु, त्या आधी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे असल्याने कृषी विभागाने त्वरित संबंधित कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याच्या आदेश द्यावे, अशी मागणी माजी आमदार सुरेश लाड यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. शेतात राब उगवला असून, लावणी करण्याची वेळ आली आहे. मात्र, दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील राब हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर नव्याने पेरणीचे संकट ओढावले आहे. नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून भरपाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा द्यावा. अशा मागणीचे निवेदन लाड यांनी तहसील कार्यालय आणि कृषी अधिकारी कार्यालयात सादर केले आहे.
सततच्या होणाऱ्या नैसर्गिक हानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेती करावी की नाही? असा त्यांना प्रश्न पडला आहे. हाच परिणाम म्हणून काही शेतकरी शेती कमी जास्त भावात विकून टाकत असल्याचे मागील काही वर्षांत दिसून आले आहे.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी त्वरित कर्जत कृषी कार्यालयात संपर्क साधून नुकसानीची कल्पना द्यावी.
- सुरेश लाड, माजी आमदार
-----------------------
कृषी विभागाने गावोगावी शेतीच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करावी. तसा अहवाल बनवून सरकारकडून लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावा.
- श्रीकांत पाटील, शेतकरी, वदप
--------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36645 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..