
निसर्ग सौंदर्याची भुरळ
अमित गवळे, पाली
माणगाव तालक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व ताम्हिणी घाटातील फेसाळलेले धबधबे, अप्रतिम निसर्गसौंदर्य व जैवविविधतेची सध्या पर्यटकांना चांगलीच भुरळ पडली आहे. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य स्वर्गाची अनुभूती देते. पुणे व मुंबईतून हजारो पर्यटक दर वर्षी वर्षासहलीसाठी या ठिकाणी आवर्जून भेट देतात.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पाटणूस, विळे, भिरा व रवाळजे आदी गावे सह्याद्रीच्या पर्वतरांगानी वेढली गेली आहेत. या परिसराला नैसर्गिक जैवविविधतेची दैवी देणगी मिळाली असून सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यांतून फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे अंगावर घेण्याची मौजमजा काही औरच आहे.
भिरा येथील देवकुंड हे येथील सर्वात प्रसिद्ध व विलोभनीय ठिकाण असून येथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो. तसेच खजिना डोंगरावरील ट्रॅक प्रसिद्ध आहे. येथे दुर्मिळ गिधाडांचे वस्तीस्थान आहे. उंच डोंगरावरून भिऱ्याचे विस्तीर्ण धरण, सह्याद्रीच्या डोंगररांगा, नद्या, फेसाळणारे धबधबे व आजूबाजूचा आकर्षक परिसर दृष्टिक्षेपात येतो. विळे गावाजवळ बेडगाव येथे देवकुंडप्रमाणे एक कुंड आहे.
रवाळजे येथे असलेले ‘व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात रवाळजेसह फक्त जम्मू काश्मीर, उत्तराखंड, मेघालय या ठिकाणीच व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग चालते. त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. भीमा शंकर येथे सापडणारा राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन, राज्य फुल ताम्हण परिसरात आढळतात. तसेच गिधाडे, बिबटे व इतर दुर्मिळ पशू-पक्ष्यांची निवासस्थाने परिसरात आहेत.
ऐतिहासिक महत्त्व
दुसऱ्या महायुद्धातील पराक्रमाबद्दल व्हिक्टोरिया क्रॉसने गौरविलेले वीर यशवंत घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मी घाडगे यांचे माहेर पाटणूस आहे. तसेच पहिल्या महायुद्धात पराक्रम करून धारातीर्थी पडलेल्या येथील ४५ सैनिकांसाठी ब्रिटिशांनी पाटणूस येथे स्मृतिस्तंभ उभारला आहे.
सोशल मीडियावरही पसंती
पाटणूस येथील कुंडलिका विद्यालयाचे निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंडे यांनी, पाच वर्षांपूर्वी ‘इन्क्रेडिबल कोकण’अंतर्गत ताम्हिणी, विळे, पाटणूस, भिरा हे फेसबुक पेज तयार केले आहे. येथील अमूल्य ठेवा जगासमोर छायाचित्राच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते संपूर्ण परिसर पादाक्रांत करीत आहेत. येथील दुर्मिळ पशू-पक्षी, झाडे, नद्या, नाले, डोंगर व निसर्गाची अद्भुत रूपे त्यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहेत. एवढेच नाही, तर या सगळ्याची शास्त्रशुद्ध माहितीही मिळविली आहे.
पर्यटकांसाठी सोयीसुविधा
पाटणूस व विळे-भागाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. पाटणूस, विळे व म्हसेवाडी येथे दोन चेकपोस्ट उभारले आहेत. पर्यटकांसाठी पाटणूस परिसरात आसनव्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी सूचना फलक लावले असून स्थानिक गाइडना ओळखपत्र दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पाटणूसमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. ग्रामस्थ व पर्यटकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36688 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..