कर्जत विठ्ठल मंदिर परिसरात नवीन शिलालेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत विठ्ठल मंदिर परिसरात नवीन शिलालेख
कर्जत विठ्ठल मंदिर परिसरात नवीन शिलालेख

कर्जत विठ्ठल मंदिर परिसरात नवीन शिलालेख

sakal_logo
By

हेमंत देशमुख, कर्जत
कर्जत शहरातील दहिवली येथील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या तटबंदीच्या आत नवीन शिलालेख असल्याचा शोध प्रबंधक सागर माधुरी मधुकर सुर्वे यांनी लावला आहे. या शिलालेखामुळे मंदिर पंचायतनाच्या इतिहासात नव्याने भर पडली आहे. विठ्ठल मंदिरातील शिलालेखांची संख्या आता दोन झाली आहे.

कर्जत तालुक्यात सातवाहनकालीन लेणी व व्यापारी घाटवाटा, शिवकालीन गडकिल्ले आणि मराठेशाहीतील पेशव्यांनी उभी केलेली मंदिरे आहेत. तालुक्यात जशी शिलाहारकालीन गावे आहेत. तसे पेशव्यांनी सुभेदार पदावर नेमलेल्या पिंपुटकरांनी व्यापक रूप दिलेले दहिवली गाव सुद्धा आहे. याच गावामध्ये उल्हास नदीच्या काठावर एकमेव मंदिर पंचायतन उभे आहे. या पाच मंदिराच्या संकुलातील प्रमुख मंदिर पार्वतीबाई पिंपळवटकर म्हणजेच त्या काळी सुभेदार असलेले पिंपुटकर यांनी बांधले. त्यासाठी पुणे दरबारी जमीन मिळवल्यापासून नोंदी पाहायला मिळतात. तटबंदीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला पार्वतीबाई पिंपळवटकर यांच्या नावाचा शिलालेख आहेच; पण धर्मशाळा जिथे बांधली गेली, तिथे दुसरा शिलालेख गाडला गेला होता. नवीन बांधकामावेळी तो संस्थानाचे सदस्य मुकुंद मोगरे यांना दिसून आला. त्यांनी इतिहास अभ्यासक व संशोधक सागर सुर्वे यांच्या निदर्शनास आणून दिला. पुरातत्वीय दृष्टिकोनातून शिलालेख संपूर्ण स्वच्छ केला असता तो सुस्थितीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सुर्वे यांनी जुने कागद अभ्यासून शिलालेख ज्यांच्या नावाने आहे, त्यांची ओळख पटवली आणि तो शिलालेख शोधप्रबंधामार्फत प्रकाशित केला. शिलालेखामुळे मंदिर पंचायतनाच्या इतिहासात नव्याने भर पडली असून, विठ्ठल मंदिरातील शिलालेखांची संख्या आता दोन झाली आहे.


वैशिष्ट्यपूर्ण मंदिर
पाच मंदिरांचे स्थापत्य बांगलाशैलीतील चारचालामध्ये असून, येथे पडणारा मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीकडून येणारा वारा याचा विचार केलेला आहे. आजही विठ्ठल संस्थानाने या मंदिरांच्या शैली जपलेल्या आहेत. विठ्ठल मंदिराला चहुबाजूंनी तटबंदी असून, आतमध्ये जायला एकच पण भव्य असे प्रवेशद्वार आहे. त्यावरील शिल्प व त्याचे महत्त्व महाराष्ट्रात कुठेही पाहता येत नाहीत. या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तर तटबंदीच्या आतमध्ये विठ्ठल मंदिराच्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला श्रीरामाची धर्मशाळा आहे. याच ठिकाणी एक शिलालेख आढळला.

शिलालेखाचा इतिहास
शिलालेखातील व्यक्तीचे नाव त्रिंबक गोपाळशेठ पोतदार असे असून त्यांचा सोन्याचे दागिने घडवण्याचा व्यापार होता. ते श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी त्या काळात ३४ रुपये धाऱ्याची जमीन श्रीरामाच्या उत्सवासाठी दिली होती. तसेच शके १८१६ म्हणजे इ.स. १८९४ मध्ये सुमारे एक हजार रुपये खर्च केले, असे देवळाच्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेले आहे. त्यामध्ये त्यांनी प्रवेशद्वारावरील नगारखाना, रामाची धर्मशाळा व तटबंदीच्या आतील दोन दगडी तुळशी वृंदावने आदी वास्तू बांधल्याची नोंद आहे. या शिलालेखात त्यांचे नाव, राहण्याचे ठिकाण व वर्ष नोंदवलेले आहे.
-------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36691 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top