अंबा नदीवरील पुलाची दैना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबा नदीवरील पुलाची दैना
अंबा नदीवरील पुलाची दैना

अंबा नदीवरील पुलाची दैना

sakal_logo
By

पाली, ता. १७ (वार्ताहर) ः मुसळधार पावसामुळे शहरातील अंबा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गेल्‍या आठवड्यात वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलावरून चार ते पाच वेळा पाणी गेले. हा पूल कमकुवत झाला असून लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या एका बाजूला चिखल व राडारोडा पसरल्‍याने प्रवास धोकादायक झाले असून चालक व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पूल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला द्रुतगती मार्गाने जाणारे प्रवासी, चारचाकी तसेच अवजड वाहनेही याच मार्गावरून जातात. कायम वर्दळीच्या या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्याआधीच पुलाच्या मध्यावरील काही लोखंडी रेलिंग तुटले आहेत तर काही मुसळधार पावसात वाहून गेले आहेत. त्यांना आधार देणारे सिमेंटचे काही ठोकळेही निखळले आहेत. कमकुवत लोखंडी कठडे, मोठमोठे खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची वर्दळ, वारंवार पुलावर वाहून येणारा चिखल-राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. खड्ड्यात असंख्य वाहने आदळत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. शिवाय पादचाऱ्यांनाही पुलावरून जाताना जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते.

अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच सर्व कामे पूर्ण करणार आहोत. त्‍यामुळे चालकांसह नागरिकांची गैरसोय दूर होईल.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. संरक्षण कठड्यांअभावी अपघाताची शक्यता आहे. नवीन पुलाचे काम वेळीच न झाल्‍याने वाहनचालक, प्रवासी व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शिवाय पुलावरून पाणी गेल्यामुळे चिखल, कचरा साचल्‍याने चालकांची गैरसोय होत आहे. नवा पूल होईपर्यंत किमान जुन्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी.
- कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

नवीन पूल अपूर्ण
अंबा नदीवरील पूल जुना अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात सुरू आहे. मात्र कामातील दिरंगाई व संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे हा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते तर प्रवासी व विद्यार्थ्यांची मुसळधार पावसात गैरसोय झाली नसती.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36711 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top