
कर्जत, पुण्यातील दुर्गप्रेमींकडून साबईगडाचा शोध
कर्जत, ता. १९ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साबईगड हा डोंगरी किल्ला असल्याचे कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमी मित्रांच्या शोधमोहिमेतून समोर आले आहे. काळाच्या प्रवाहात हरवलेला साबईगड हा एक गिरीदुर्ग असल्याची माहिती कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमींनी दिली. एक अप्रकाशित किल्ल्यावर त्यांनी प्रकाश टाकत तो टेहळणीचा किल्ला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दुर्गप्रेमींनी ही शोधमोहीम इतिहास अभ्यासक तसेच दुर्ग तज्ज्ञांसमोर मांडले आहे.
पुण्यातील निहार श्रोत्री, तसेच कर्जत येथील मंदार लेले, अभिजित मराठे, शर्वरीश वैद्य, कौस्तुभ परांजपे आणि भाविक आव्हाड गेल्या वर्षी साबई डोंगरावर भटकंतीसाठी गेले होते. तो एक धार्मिक डोंगर असून तेथे देवीचे मंदिर आहे, अशी जुजबी माहिती मंदार लेले आणि निहार श्रोत्री यांना स्थानिकांकडून मिळाली होती. परंतु या डोंगरावर त्यांना अनेक दुर्ग स्थापत्य अवशेष आढळून आले. डोंगरावर साबई मातेचे धार्मिक स्थान असून देवीची मूर्ती तांदळा स्वरूपातील आहे. साबई डोंगरावर दुर्ग स्थापत्याच्या अंगाने असलेले अनेक अवशेष आढळून आले आहेत. त्यात एका पाषाणावर वीर देवाची कोरीव मूर्ती असून अनेक ठिकाणी खडकात ओळीने कोरीव पायऱ्या आहेत. साबई देवीच्या ठिकाणाहून डावीकडून १५ पायऱ्या बालेकिल्ल्यावर जातात. गडमाथा चिंचोळा आहे. गडावर टेहळणीची जागा असून तिथे बांधकामाचे जोते दिसून येते. तसेच पाण्याची टाकीही आढळून आलेली आहे. साबईगडाजवळूनच बोरघाटाला जाण्याचे रस्ते आहे. त्यामुळे या गडाचा प्रामुख्याने वापर हा चौकी पहारा देणे तसेच टेहळणीसाठी झालेला असण्याची शक्यता आहे.
गडावर जाण्यासाठी तीन वाटा
दुर्गप्रेमींनी शोधलेला साबईगड हा खालापूर आणि कर्जत तालुक्यांच्या सीमेवर आहे. वर जाण्यासाठी खालापूर तालुक्यातील कलोते या गावातून वाट आहे. गडावरील चढाई सोपी असून जायला तीन वाटा आहेत. प्रामुख्याने सोपी आणि पहिली वाट कलोते गावातून थेट गडावर जाते. दुसरी वाट ही गावाजवळील माधवबाग आयुर्वेदिक केंद्राच्या मागून गडावर जाते. तर तिसरी वाट ही खालापूर फाट्याजवळून गडावर जाते. गडमाथ्यावरून सोंडाई, माणिकगड, सोनगिरी, इर्शाळ या किल्ल्यांप्रमाणे राजमाची, प्रबळगड, ढाकबहिरी हे सुद्धा किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात.
---------------
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36720 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..